- मनोज गडनीस, मुंबई
मंदीचे सावट उठल्यानंतर आणि प्रथमच देशांतर्गत अर्थव्यवस्थेत सुधार दिसून आल्यानंतर यंदा दसरा आणि दिवाळी साजरी करण्यासाठी व्यापारी आणि ग्राहक दोघांच्यातही उत्साह दिसत असून, यामुळे यंदा उलाढालीचा नवा उच्चांक गाठला जाण्याचे संकेत मिळत आहेत.
नवरात्रीच्या निमित्ताने कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू इथपासून ते वाहन बाजार, बांधकाम उद्योग, सोने व्यापार अशा सर्वच बाजारपेठांतून उत्साहाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी विक्रीच्या आकर्षक योजना सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांच्या अर्थव्यवस्थेतील खडतर प्रवासानंतर प्रथमच व्याजदरातही आकर्षक कपात केल्याने अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याची चुरस बाजारात सुरू असल्याचे दिसून येत आहे. या निमित्ताने बाजारात मारलेला फेरफटका...
सोने खरेदीचा ट्रेंड यंदाही कायम
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा दसऱ्याचा सण असल्यामुळे या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. गेल्या दोन वर्षांबद्दल सांगायचे तर सोन्याचा भाव प्रति तोळा २६ हजार ते २९ हजार रुपयांच्या दरम्यान होता. त्यामुळे सोन्याच्या बाजारात थंड वातावरण होते. यंदाच्या वर्षी काही प्रमाणात ते कमी झाले आहेत. तरीही सणासुदीच्या काळात मुहूर्ताची अशी खरेदी झालीच. गेल्या दसऱ्याला राज्यात सुमारे सव्वाटन सोन्याची विक्री झाली होती.
सोन्याचे दर तुलनेने कमी असले तरी, ते सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचेच आहेत. त्यामुळे ग्राहकांना या मुहूर्तावर सोनेखरेदी करता यावी, याकरिता अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची वळी, नाणी इथपासून ते आॅर्डरप्रमाणे बनवून देण्याची सुविधा ज्वेलर्सनी उपलब्ध करून दिली आहे. तसेच, अनेक मोठ्या ज्वेलर्सनी क्रेडिट कार्ड कंपन्यांशी करारबद्ध होत, क्रेडिट कार्डावरून ईएमआय पद्धतीने सोन्याची विक्री करण्याची घोषणा केली आहे.
आॅनलाईन खरेदीचा ट्रेंड
सणासुदीच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपन्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, या कंपन्यांनी किमान २० ते कमाल ४० टक्क्यांपर्यंत सूट योजना जाहीर केल्या आहेत. काही उत्पादनांसाठी तर ‘फ्लॅश सेल’ अर्थात मर्यादित तासांसाठी काही विशिष्ट उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. तसेच, ग्राहकाला खरेदी करणे सुलभ व्हावे, म्हणून या कंपन्यांनी क्रेडिट कार्ड कंपन्या व बँकांशीदेखील करार केला आहे. या माध्यमातून विनासायास वित्तसाहाय्य करणे सुलभ होणार आहे.
बांधकाम उद्योगाच्या आकर्षक योजना
बांधकाम व्यावसायिक आनंद मंडलेचा यांनी सांगितले की, मंदीमुळे अत्यंत हालाखीच्या परिस्थिती लोटल्या गेलेल्या बांधकाम उद्योगाला यंदा साथ मिळाली आहे, ती व्याजदर कपातीची. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपोदरात अर्धा टक्का कपात केल्यानंतर अनेक बँकांनी व्याजदरात कपात करीत या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविला आहे. त्यामुळे त्याचा पुरेपूर लाभ उठविण्यासाठी बांधकाम उद्योग दसरा- दिवाळीनिमित्त दरात विशेष कपात करतानाच, स्टॅम्प ड्यूटी व रजिस्ट्रेशनचा खर्च स्वत: करण्याची आॅफर देत आहेत.
काही ठिकाणी रेफ्रिजरेटर, टीव्ही किंवा काही ठिकाणी जर मुख्य शहरापासून बांधकाम प्रकल्प दूर असेल तर तिथवर जाण्यासाठी फ्लॅटसोबत बाईक देण्याचीही आॅफर सुरू आहेत, तर काही ठिकाणी लकी ड्रॉ योजनेंतर्गत थेट कार बक्षीस देण्यापर्यंत आॅफर आखण्यात आल्या आहेत.
कन्झ्युमर लोन की क्रेडिट कार्डावर ईएमआय?
इलेक्ट्रॉनिक्स वस्तंूच्या बाजारात अनेक कंपन्यांनी आपापल्या लोकप्रिय उत्पादनांची नवनवी मॉडेल्स सादर केली आहे. टीव्ही, फ्रीज, डीव्हीडी, मोबाईल फोन, म्युझिक सिस्टीम अशा सर्वांवर सूट व भेट योजनेसह कंपन्या सज्ज आहेत. या सर्वांच्या खरेदीसाठी ग्राहकाला क्रेडिट कार्डांवरून ईएमआयपद्धतीने खरेदी किंवा बँकेच्या मार्फत कन्झ्युमर लोन असे पर्याय आहेत. अर्थात, या दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे वेगवेगळे आहेत.
कन्झ्युमर लोनचे तोटे कर्जाची कमाल मर्यादा ५० हजार रुपये इतकी आहे.
पुराव्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतात.
कर्ज मंजुरीसाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो.
कन्झ्युमर लोनचे फायदे
सरासरी १५ टक्के व्याजदर आकारणी होते.
कर्ज फेडण्यासाठी कमाल तीन वर्षांपर्यत कालावधी मिळतो.
क्रेडिट कार्डाचे फायदे
क्रेडिट कार्डावर असलेली पैशाची मर्यादा व वस्तूची किंमत या अनुषंगाने कर्ज मंजूर होते.
यामध्ये पुराव्यापोटी कागदपत्रांची आवश्यकता भासत नाही.
खर्च केलेली रक्कम, सहा, नऊ किंवा बारा महिन्यांच्या मुदतीत परत करता येते.
क्रेडिट कार्डाचे तोटे
व्याजदर सरासरी
२२ टक्के व त्यापुढचा लागतो.
१२ महिने हा पैसे परत करण्याचा कमाल कालावधी आहे.
एकरकमी पैसे अडकून पडतात. हप्ता चुकल्यास ४० टक्के दराने आकारणी होते .