Join us

विप्रोच्या अध्यक्षांच्या मानधनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2017 12:20 AM

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी विप्रोची व्यावसायिक कामगिरी तुलनेने खालावलेली

बंगळुरू : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी विप्रोची व्यावसायिक कामगिरी तुलनेने खालावलेली असून त्याचा फटका कंपनीच्या अध्यक्षांच्या मानधनाला बसला. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांच्या २०१६-२०१७ वर्षाच्या मोबदल्यात ६३ टक्क्यांची घट होऊन ते १२१,८५३ डॉलर झाले. कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट झाल्यामुळे प्रेमजी यांना कमिशन म्हणून काहीही मिळाले नाही. प्रेमजी यांना त्याआधीच्या वर्षात कमिशन म्हणून १३९,६३४ डॉलर मिळाले होते. प्रेमजी हे इक्रिमेंटल नेट प्रॉफिटवर ०.५ टक्के दराने कमिशन मिळण्यास पात्र आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. ३१ मार्च, २०१७ ला संपलेल्या आर्थिक वर्षात प्रेमजी यांना मार्च २०१७ संपलेल्या वर्षात कंपनीचा निव्वळ नफा घटल्यामुळे काहीही कमिशन दिले गेलेले नाही, असे कंपनीने निवेदनात म्हटले. विप्रोच्या माहिती व तंत्रज्ञान व्यवसायाचे निव्वळ उत्पन्न २०१६-२०१७ वर्षात ४.७ टक्क्यांनी खाली येऊन १.३ अब्ज डॉलर झाले.