अहमदनगर : तीन महिन्यांत नगर जिल्ह्यात जानेवारीअखेर ६२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून मार्चअखेर गाळप हंगाम सुरू राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. ६५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले असून गाळप आणि साखर उत्पादनात अंबालिका साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी १ कोटी २० लाख मेट्रिक टन गाळप झाले होते. यंदा त्यात दहा टक्के घट येणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याचा विषय गाजत आहे. साईकृपा क्रमांक २ हा कारखाना एफआरपीमुळे सुरू होवू शकलेला नाही. काही कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्यानंतर त्यांची एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी धावपळ झाली होती. एकीकडे उसाची टंचाई आणि त्यातून सुरू असलेली उसाची पळवापळवी, त्यात साखरेच्या भावाचा प्रश्न अशा दृष्टचक्रातून साखर कारखानदारी मार्गस्थ होताना दिसत आहे. गंगामाई कारखाना वगळता सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा दहाच्या पुढे निघालेला आहे. सर्वाधिक साखर उतारा मिळविण्यातही अंबालिका आघाडीवर असून या कारखान्याचा साखर उतारा ११.३९ टक्के निघालेला आहे. उसाचा प्रश्न आणि साखरेचा भाव यामुळे नगर तालुका साखर कारखाना (पियुष) सुरू होवून महिनाभरात बंद पडला आहे. पाच लाखाच्या पुढे गाळप करण्यात ज्ञानेश्वर कारखान्याचा समावेश आहे. विखे आणि थोरात कारखाना ४ लाखाच्या टप्प्यात आहेत. गेल्या वर्षी १ कोटी २० लाख मेट्रीक टन गाळप झाले होते. यंदा त्यात दहा टक्के घट येणार असल्याचा अंदाज आहे. एप्रिल ते जून २०१५ या काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चारा म्हणून उसाचा वापर केल्याने यंदा साधारण दहा लाख मेट्रीक टन गाळप कमी होणार आहे.
दहा टक्क्यांनी ऊस गाळप घटणार
By admin | Published: February 01, 2016 2:16 AM