लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड-१९ साथीमुळे कुटुंबाची वित्तीय बचत (हाऊसहोल्ड फायनान्शिअल सेव्हिंग्ज), बँक ठेवी, जीवन विमा निधी, चलनधारकता व कुटुंबावरील कर्ज (हाऊसहोल्ड डेब्ट) यावर तीव्र परिणाम झाल्याचे दिसून आले आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. या काळात बचतीत घट झाली असतानाच कर्जात वाढ झाली आहे. अहवालानुसार, साथीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत कुटुंबाची आर्थिक बचत वाढली होती. त्यानंतर मात्र सलग दोन तिमाहींत ती घसरली. जूनच्या तिमाहीत जीडीपीच्या तुलनेत २१ टक्के असलेली कुटुंबाची बचत तिसऱ्या तिमाहीत घसरून ८.२ टक्क्यांवर आली. जूनच्या तिमाहीत ८,१५,८८६ कोटी रुपये असलेली कौटुंबिक बचतीची रक्कम डिसेंबरच्या तिमाहीत ४,४४,५८३ कोटी रुपयांवर घसरली.
बँकांमधील ठेवींतील कौटुंबिक ठेवींचे जीडीपीच्या तुलनेतील प्रमाणही ७.७ टक्क्यांवरून घसरून ३.० टक्क्यांवर आले आहे. सप्टेंबरमध्ये कौटुंबिक ठेवी ३,६७,२६४ कोटी रुपये होत्या. डिसेंबरमध्ये त्या घसरून १,७३,०४२ कोटी रुपये झाल्या. साथीच्या काळात गरज भागविण्यासाठी लोकांनी ठेवी काढून घेण्यास प्राधान्य दिल्यामुळे ही घसरण झाली. साथ जशी वाढत गेली तशी ठेवींच्या रकमेत घसरण होत गेली. २०२० च्या जानेवारी-मार्च तिमाहीत ४,५५,४६४ कोटी रुपयांच्या असलेल्या ठेवी एप्रिल-जून तिमाहीत १,२५,८४८ कोटी रुपयांवर आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
साथ काळात लोकांनी स्वत:कडे रोख रक्कम बाळगण्यास प्राधान्य दिल्यामुळे २०२० मधील जूनच्या तिमाहीत हातातील रोकड उच्चांकी २,०६,८८९ कोटींवर पोहोचली होती. साथ कमी झाल्यानंतर डिसेंबरमध्ये ती घसरून ९१,४५६ कोटींवर आली. फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा एकदा हातामधील रोकड वाढल्याचे दिसून आले. कौटुंबिक कर्जाचे जीडीपीच्या तुलनेतील प्रमाण मार्च २०१९ पासून सातत्याने वाढत आहे. डिसेंबर २०२० अखेरीस ते वाढून ३७.९ टक्क्यांवर पोहोचले.
विम्याच्या हप्त्यामध्ये झाली वाढ
वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विम्याच्या हप्त्यात ७.४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. जीवन व बिगर-जीवन विम्याच्या एकत्रित व्यवसायात ९ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते मे या काळात ही वाढ १७ टक्के आहे. वित्त वर्ष २०२१ च्या तीन तिमाहींत पोस्ट ऑफिस व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांसारख्या अल्पबचतीतील ठेवी ७५,८७९ कोटींवर अपरिवर्तित राहिल्या.