Join us

जगभरातील अनेक देशांचा 'मेड इन इंडिया' शस्त्रांवर विश्वास; 2023 मध्ये विक्रमी निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 5:18 PM

भारताच्या संरक्षण क्षेत्राने यावर्षी नवा विक्रम केला आहे.

India Defence Export Record: भारताच्या संरक्षण क्षेत्राने यावर्षी नवा विक्रम केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3000 कोटी रुपयांची ज्यादा संरक्षण निर्यात झाली आहे. ज्यामध्ये मोठ्या शस्त्रांपासून ते लहान उपकरणांपर्यंतचा समावेश आहे. यासोबतच संरक्षण उत्पादनाचा विक्रमही मोडला आहे. यावर्षी 1 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन झाले आहे. 

भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, या वर्षी जगभरातून LCA-तेजस, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, विमानवाहू युद्धनौका आणि इतर गोष्टींना मागणी होती. भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी अभियानांतर्गत भारतात बहुतांश वस्तू, शस्त्रे आणि उपकरणे तयार करण्यावर भर दिला जातोय. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2022-23 आर्थिक वर्षात सुमारे 16 हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात झाली. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम 3000 कोटी रुपये जास्त आहे. तर 2016-17 च्या तुलनेत ते 10 पट अधिक आहे.

भारत सध्या 85 हून अधिक देशांमध्ये संरक्षण उत्पादनांची निर्यात करत आहे. सध्या देशातील 100 हून अधिक कंपन्या इतर देशांना संरक्षण उत्पादने निर्यात करत आहेत. यामध्ये शस्त्रास्त्रांपासून ते विमान, क्षेपणास्त्रांपासून रॉकेट लाँचरपर्यंतचा समावेश आहे. निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये डॉर्नियर-228 विमाने, 155 मिमी एटीजीएस, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, रडार, सिम्युलेटर, खाणविरोधी वाहने, चिलखती वाहने, पिनाका रॉकेट लॉन्चर्स, शस्त्रे, थर्मल इमेजर, बॉडी आर्मर, एव्हिओनिक्स आणि विमानांचा समावेश आहे.  

टॅग्स :संरक्षण विभागभारतव्यवसायकेंद्र सरकार