नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये असलेल्या आपल्या नातेवाइकांसाठी तुम्ही काही भेट किंवा पदार्थ आवडीने पाठविला असल्यास ताे लवकर मिळण्याची शक्यता नाही. कार्गाेसेवा कंपन्यांसमाेरील विविध अडचणींमुळे किमान १५ दिवसांचा उशीर हाेण्याचा अंदाज आहे. त्यातही १५ दिवसांच्या आत खराब हाेतील, अशा नाशवंत वस्तू किंवा खाद्यपदार्थ पाठवू नका, अशा विनंतीवजा सूचना कार्गाे कंपन्यांकडून देण्यात येत आहेत.काेराेना महामारीच्या काळात भारतातून ठरावीक विमाने साेडल्यास नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा बंदच आहे. मात्र, कार्गाेसेवा सुरूच हाेती. गेल्या काही आठवड्यांमध्ये लसीकरण वाढल्या नंतर उद्याेगधंदे पूर्वपदावर येऊ लागले आहेत. मात्र, आता कार्गाेसेवेला माेठा विलंब हाेत असल्याचे आढळून आले आहे. विशेषत: अमेरिका, युराेप आणि चीनमधील कार्गाेवर हा परिणाम जास्त आहे. सुमारे १५ दिवसांचा विलंब हाेत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त उशीर लागण्याची शक्यता आहे. एअर कार्गाेसह सागरी मार्गाने हाेणाऱ्या कार्गाे वाहतुकीला तर ७० दिवसांहून अधिक वेळ लागताना दिसत आहे. हा कालावधी विचारात घेऊन नाशवंत पदार्थ पाठविणे टाळावेत, असे मेसेजेस कार्गाे कंपन्यांनी ग्राहकांना पाठविण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या ताेंडावर अनेकांनी परदेशातील आप्तेष्टांना खाद्यपदार्थ, फराळ इत्यादी पाठविले आहे. मात्र, ते विलंबाने मिळतील, असे चित्र सध्या आहे.
विलंबाची कारणे काय?सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, कार्गाे विमानांच्या वैमानिकांना तसेच क्रू मेंबर्सना सातत्याने क्वारंटाइन राहावे लागत आहे. अमेरिका, ब्रिटन, चीनसह अनेक देशांच्या नियमांनुसार ७ ते १४ दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी आहे. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध हाेत नसल्याचे चित्र आहे.