ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - व्हॉट्सअॅपवर टाकलेला मेसेज डिलीट किंवा एडिट करण्याच्या फीचरची चाचणी वर्षाच्या सुरूवातीपासून सुरू आहे. मात्र, हे फीचर अजूनपर्यंत व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करण्यात आलेलं नाही. पण आता हे फीचर लवकरच येणार असल्याचं वृत्त आहे. इतकंच काय,व्हॉट्सअॅपने प्रायोगिक तत्त्वावर रिकॉल हे फीचर अॅड केल्याची माहिती "वॅबीटाइन्फो" (WABetaInfo) या ट्विटर हँडलने दिली आहे. iPhone साठी व्हॉट्सअॅपच्या 2.17.30+ व्हर्जनमध्ये हे फीचर लवकरच अॅड केलं जाणार असल्याची माहिती "वॅबीटाइन्फो" (WABetaInfo) ने दिली आहे. पण नक्की हे फीचर कधी येणार याबाबत माहिती दिलेली नाही. "रिकॉल" या फिचरद्वारे 5 मिनिटांच्या आत पाठवलेला मेसेज परत मिळवण्याची म्हणजेच रिकॉल करण्याची संधी आता व्हॉट्सअॅप उपलब्ध करून देणार आहे.
आपण आपल्या मित्रांना किंवा ग्रुपमध्ये कोणताही मेसेज, फाइल किंवा ऑडिओ मेसेज सोबतच व्हिडीओ कॉलही करतो. एखादा मेसेज पाठवल्यावर हा मेसेज पाठवून आपण चुकी केली असं तुम्हाला कधी तरी वाटलं असेल, किंवा एखादा मेसेज तुम्ही चुकीच्या व्यक्तीला किंवा ग्रुपवर पाठवला असेल. पण एकदा मेसेज गेला की तुम्हाला काहीच करता येत नाही. मात्र, आता लवकरच यासाठी व्हाट्सअॅप रिकॉल हे फीचर अॅड करणार आहे.
कसं काम करणार हे फीचर-
कोणत्याही मेसेजला काही सेकंदांसाठी टच केल्यास स्क्रीनवर रिकॉल हे ऑप्शन येईल. याद्वारे तुम्ही तो मेसेज डिलीट करू शकतात. तुम्ही तो डिलीट केल्यास मेसेज सेंड केलेल्या व्यक्तीस मेसेज रिव्होक करण्यात आला आहे असा मेसेज दिसेल. मात्र, ग्रुप चॅटवर तुम्ही हे फीचर वापरू शकतात की नाही हे अजून स्पष्ट नाही. काही महिन्यापूर्वी व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरू करणा-या व्हॉट्सअॅपचं हे सर्वात महत्वाचं फीचर असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय व्हॉट्सअॅप बिझनेस युजर्ससाठी एक खास अॅप डेव्हलप करण्यावरही काम करत असल्याचं वृत्त आहे. व्हाट्सअॅप फॉर बिझनेस असं या अॅपचं नाव असण्याची शक्यता आहे.