नवी दिल्ली : डाळींचे भाव सतत वाढत चालले असतानाच दररोज १ लाख किलो तूर डाळ १३५ रुपये प्रतिकिलो दराने विकण्याची तयारी डाळ आयातदारांनी दर्शविली आहे; मात्र त्याचबरोबर डाळींचा साठा किती ठेवावा यावरील मर्यादेत सवलत देण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज डाळींची आयात करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेतली. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारातून डाळी मागविताना आयातदारांना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. डाळींच्या किमती भडकल्याने त्या नियंत्रित आणण्यासाठी सरकार योजत असलेल्या उपायांचा भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीनंतर मुंबईस्थित डाळींच्या व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण डोंगरे यांनी पत्रकारांना सांगितले की, देशात डाळींची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आल्यानंतरच भाव खाली येतील. त्यामुळे आयातदारांना डाळीचा साठा ठेवण्यावर मर्यादा ठेवली जाऊ नये. साठ्याच्या मर्यादेपासून आयातदारांना मुक्त ठेवावे.
डाळींच्या साठ्याची मर्यादा निश्चित करण्याशिवाय सरकारने याबाबत आणखी काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार बाजारात डाळींचे भाव स्थिर राहावेत यासाठी ४० हजार टन बफर स्टॉक करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांकडून डाळींची खरेदी सुरू केली जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारांनीही साठेबाजारांविरुद्ध मोहीम उघडून ३६ हजार टन डाळ जप्त केली आहे. २०१४-१५ मध्ये पाऊस कमी पडल्याने डाळींचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले आहे.
साठ्यावरील मर्यादा हटवा; १३५ रुपये किलोने डाळ देऊ
डाळींचे भाव सतत वाढत चालले असतानाच दररोज १ लाख किलो तूर डाळ १३५ रुपये प्रतिकिलो दराने विकण्याची तयारी डाळ आयातदारांनी दर्शविली आहे; मात्र
By admin | Published: October 24, 2015 04:34 AM2015-10-24T04:34:09+5:302015-10-24T04:34:09+5:30