धनत्रयोदशीनिमित्त बहुतांश लोक सोन्या-चांदीची नाणी खरेदी करतात. मंगळवारी धनत्रयोदशीनिमित्त अनेक क्विक कॉमर्स कंपन्यांनी १० मिनिटांत सोन्या-चांदीच्या नाण्यांची डिलिव्हरी करण्याची सुविधा सुरू केली होती. यात ब्लिंकिट या क्विक कॉमर्स कंपनीचाही समावेश होता. दिल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीनं ब्लिंक्किटवरून सोन्याचं नाणं मागवलं. त्या व्यक्तीनं ब्लिंक्किटवरुन मागवलेलं नाणं कंपनीच्या दाव्याप्रमाणे १० मिनिटांत घरीही आलं. पण बॉक्स उघडताच त्या व्यक्तीला धक्काच बसला.
काय घडला प्रकार?
मोहित जैन नावाच्या व्यक्तीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. या व्यक्तीनं ब्लिंकिटवरून १० ग्रॅम चांदीचं नाणं आणि १ ग्रॅम वजनाचं सोन्याचं नाणं मागवलं होतं, जे १० मिनिटांत त्याच्या घरी पोहोचवलं गेलं. मोहितनं जेव्हा आलेलं पॅकेट उघडलं तेव्हा सोन्याचं नाणं १ ग्रॅमऐवजी ०.५ ग्रॅम असल्याचं समोर आलं.
काय म्हटलं ग्राहकानं?
"२० मिनिटांमध्ये जेव्हा मी घरी आलो तेव्हा ते पाहून पायाखालची जमिनच सरकली. कंपनीनं चुकीचा प्रोडक्ट माझ्यापर्यंत पोहोचवला. ब्लिकिंटनं माझ्याकडे ०.५ ग्रामचं गुलाबाचं डिझाइन असलेलं सोन्याचं नाणं पोहोचवलं. पण मी माता लक्ष्मीचं डिझाईन असलेलं १ ग्राम सोन्याचं नाणं मागवलं होतं. इतकंच नाही तर २० मिनिटांनंतर रिटर्न विंडोही बंद झाली. मला सपोर्ट एक्झिक्युटिव्हशीही बोलता आलं नाही. मी घरी ते पोहोचवणाऱ्याला विचारलं तेव्हा तोदेखील मला का विचारता असं म्हणत ओरडला," असं मोहितनं पोस्टमध्ये लिहिलंय. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही वेळानं सपोर्ट टीमनं त्याच्याशी संपर्क साधला आणि ते बदलून देण्याचं आश्वासन दिलं, असंही त्यांनी नंतर म्हटलं.