नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकी(Delhi Assembly Election Result 2020) च्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीनं सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यां(IOC, BPCL, HPCL)नी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सलग दुसऱ्या आठवड्यात कपात केली आहे. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव 5 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आले आहेत. पेट्रोल-डिझेल पाच महिन्यांपूर्वीच्या भावावर मिळत आहे. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 72 रुपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलचा दर 65 रुपये प्रतिलिटर आहे. नव्या वर्षात आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 रुपये प्रतिलिटर घसरण झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव 71.94 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर 64.87 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. तसेच मुंबईत पेट्रोल 77.60 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचे दर 74.58 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईत पेट्रोलचे दर 74.73 रुपये प्रति लीटर आहे. परदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण होत असल्यानंही पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले आहेत. त्याचाच प्रभाव घरगुती बाजारावरही पडला आहे. गेल्या महिन्याभरात क्रूड ऑइल 30 टक्क्यांनी स्वस्त झालं आहे.
शहरं | पेट्रोल | डिझेल |
दिल्ली | 71.94 | 64.87 |
मुंबई | 77.60 | 67.98 |
कोलकाता | 74.58 | 67.19 |
चेन्नई | 74.73 | 68.50 |
चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कच्चे तेल घसरण्यामागेसुद्धा तेच कारण असल्याचं बोललं जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची मागणी कमी झालेली असून, त्याचा प्रभाव किमतींवर पडत आहे. येत्या काही दिवसांत कच्चे तेल आणखी स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.