>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - पॅसिफिक महासागरावरून दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को असे नॉनस्टॉप उड्डाण करून एअर इंडियाने आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले आहे. गेल्या आठवड्यात एअर इंडियाने नवी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत नॉनस्टॉप उड्डाण करून हा विक्रम नोंदवला.
सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी अटलांटिक महासागरावरून जाणाऱ्या मार्गापेक्षा पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या मार्गाचे अंतर 1400 किमीने अधिक आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाने पॅसिफिक महासागरावरून उड्डाण करताना 15 हजार 300 किमी अंतर 14.5 तासांमध्ये पार केले. अटलांटिक मार्गापेक्षा हा मार्ग दूर असूनही अटलांटिक मार्गावरून जाताना लागणाऱ्या वेळापेक्षा दोन तास कमी वेळात विमानाने हे अंतर पार केले आहे.
एअर इंडियाची दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को या 13 हजार 900 किमी मार्गावरील थेट विमानसेवा एमिरेट्स एअरलाइन्सच्या दुबई ते ऑकलंड या (14 हजार 120 किमी) मार्ग अंतर कापणाऱ्या विमान सेवेनंतर सर्वात लांब अंतर कापणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची विमानसेवा होती. आता पॅसिफिक महासागरावरून जाणारी एअर इंडियाची नवी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को ही विमानसेवा सर्वात लांब मार्गावर उड्डाण करणारी विमानसेवा ठरली आहे. आता सिंगापूर एअरलाईन्सची सिंगापूर ते न्यूयॉर्क ( अंतर 16 हजार 500 किमी) ही थेट विमानसेवा सुरू होईपर्यंत सर्वात लांब थेट विमानसेवा देण्याचा विक्रम एअर इंडियाच्या नावावर राहील.