Join us

गुंतवणुकीची उत्तम संधी! आता Delhivery आणतेय IPO; ५ हजार कोटी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 5:40 PM

मालवाहतूक आणि पुरवठा साखळी असलेल्या या कंपनीचा आयपीओ नेमका कधी खुला होणार? जाणून घ्या...

नवी दिल्ली: आताच्या घडीला भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या IPO ची धूम शेअर मार्केटमध्ये दिसत आहे. एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. शेअर मार्केटमध्ये चढ-उतार होताना दिसत असले, तरी आयपीओंचा धडाका सुरूच आहे. यातच आता मालवाहतूक आणि पुरवठा साखळी असलेल्या Delhivery लिमिटेडने IPO ची घोषणा केली आहे. ११ मेपासून या कंपनीचा आयपीओ खुला होणार आहे. 

देल्हीव्हेरी लिमिटेडने ५,३२५ कोटी रुपयांचे भांडवल उभारणीसाठी आयपीओ आणत असल्याचे जाहीर केले आहे. येत्या ११ मे २०२२ पासून आयपीओ खुला होणार आहे. १३ मे २०२२ पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येईल. या योजनेत प्रत्येक समभागासाठी ४६२ ते ४८७ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची विशेष सवलत

देल्हीव्हेरी लिमिटेडच्या आयपीओमध्ये कर्मचारी राखीव कोट्यामध्ये पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक इक्विटी समभागाला २५ रुपये सवलत देण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना बोली किमान ३० इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ३० च्या पटीत लावता येईल. दर्शनी मूल्य १ रुपये असणाऱ्या प्रत्येक समभागासाठी ५,२३५ कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी समभाग समाविष्ट आहेत. त्यामध्ये ४ हजार कोटी रुपयांपर्यंतचे फ्रेश इश्यू असून, कंपनीच्या काही विशिष्ट भागधारकांकडून १,२३५ कोटी रुपयांपर्यंत ऑफर फॉर सेल आहे.

पात्र कर्मचाऱ्यांना २० कोटींचे इक्विटी शेअर्स राखीव

या योजनेमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्रीप्शनसाठी २० कोटींचे इक्विटी शेअर्स राखीव आहेत. तसेच या योजनेमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेत सादर होणारे इक्विटी समभाग बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्सजेंचमध्ये एकत्रितपणे नोंदणीकृत करण्याचा प्रस्ताव आहे. 

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग