नवी दिल्ली : ड्रोनद्वारे वस्तूंचा पुरवठा (ड्रोन डिलिव्हरी) आणि मानवी वाहतुकीची सेवा भारतात लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या ‘वाहतूक व्यवस्थापन आराखड्या’स नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अधिसूचित केले आहे. ड्रोनद्वारे वस्तूंचा पुरवठा सुरू झाल्यानंतर भारताच्या पुरवठा क्षेत्रात नव्या पर्वाचा उदय होईल, असे सूत्रांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, ड्रोन वाहतूक व्यवस्थापन आराखड्याअंतर्गत सरकारी व खाजगी थर्ड पार्टी सेवा पुरवठादार १ हजार फूट उंचीपर्यंतच्या आकाशात मनुष्यरहित विमानांचे व्यवस्थापन करू शकतील.नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले की, मनुष्यविरहित विमान यंत्रणाद्वारे (यूएएस) वस्तूंचा पुरवठा व मानवी वाहतूक करण्याच्या दिशेेने भारताने एक पाऊल टाकले आहे. त्यासाठी व्यवस्थापन आराखडा जारी करण्यात आला आहे.
यासाठी स्वतंत्र, आधुनिक, प्राधान्याने सॉफ्टवेअरवर आधारित आणि स्वयंचलित यूएएस वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. ही व्यवस्था नंतर पारंपरिक एटीएम व्यवस्थेशी जोडली जाईल.जारी झालेल्या आराखड्या अन्वये थर्ड पार्टी सेवादाते नोंदणी, उड्डाण नियोजन, गतिशील टकराव प्रतिबंध यांसारख्या सेवा देतील.