नवी दिल्ली : देशभरात सध्या सणासुदीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. काेराेनाचा संसर्गही कमी हाेत असल्याने विविध उद्याेगधंदे सुरू झाले आहेत. त्यामुळे आर्थिक गाडी रुळावर येत असल्याचे चित्र आहे. परिणामी, बाजारपेठांमध्ये मागणी वाढली असून राेजगार क्षेत्रावरही सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सद्यस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी अल्प कालावधीसाठी कंत्राटी कामगारांची मागणी तीन ते चारपटींनी वाढली आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी हाेत आहे. तसेच माेठ्या प्रमाणावर लसीकरणही झाले आहे. त्यानंतर आता अनेक निर्बंधही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. सध्या तिसऱ्या तिमाहीला सुरुवात झाल्यानंतर सणासुदीचा हंगाम जाेरात आहे. मागणी वाढल्यामुळे अल्प कालावधीच्या कंत्राटी कामगारांची मागणी वाढली आहे.
नाेकरभरतीमध्ये सुधारणा
भारतातील जाॅब मार्केट सध्या रिकव्हरीच्या मार्गावर आहे. चालू तिमाहीमध्ये बहुतांश कंपन्या नाेकरभरतीच्या तयारीत आहेत.
या क्षेत्रांमध्ये मागणीत वाढ
माेबिलिटी, ई-काॅमर्स, फूड, रिटेल, मार्केटिंग, ऑडिटिंग, वेअरहाऊस ऑपरेशन्स इत्यादी क्षेत्रांमध्ये अशा कंत्राटी कामगारांची मागणी वाढली आहे. ग्राहक सेवा, टेलिसेल्स, पॅकिंग, लाेडिंग-अनलाेडिंग, सॅम्पलिंग इत्यादी कामासाठी कंपन्यांची गरज आहे. अशा कामगारांच्या वेतनातही सुमारे दीडपटीने वाढ झालेली आहे.