Join us

१० काेटी किंमतीच्या घरांची मुंबईत वाढली दुप्पट मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 6:30 AM

इंडिया सोथबिज इंटरनॅशनल रियल्टी आणि सीआरई मॅट्रिक्स यांच्या संयुक्त अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : २०२१ मध्ये मुंबईत १० कोटींहून अधिक किमतीच्या उच्च दर्जाच्या घरांची विक्री दुप्पट होऊन २० ते २५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गृहकर्जावरील कमी व्याजदर आणि मोठ्या फ्लॅट्सची मागणी वाढल्याने विक्रीतील ही वाढ झाली आहे, असे एका अहवालातून समोर आले आहे.

इंडिया सोथबिज इंटरनॅशनल रियल्टी आणि सीआरई मॅट्रिक्स यांच्या संयुक्त अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार एक वर्षापूर्वी २०२० मध्ये मुंबईत नवीन घरे आणि जुनी घरे अशा एकूण ९,४९२ कोटी रुपयांच्या महागड्या निवासी मालमत्तांची विक्री झाली होती. आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये मुंबईत नवीन घरांच्या विक्रीमध्ये १३,५४९ कोटी रुपयांची ८४८ घरे विकली गेली. पुनर्विक्री झालेल्या घरांची संख्या ३६६ असून, त्यासाठी ६,७२५ कोटी रुपये मोजण्यात आले आहेत.

या भागात घरांना मागणी२०२१ मध्ये मुंबईत एकूण १,२१४ महागड्या घरांची विक्री झाली, तर २०२० मध्ये ही संख्या फक्त ५४८ होती. मुंबईत वरळी, लोअर परळ, वांद्रे, ताडदेव, प्रभादेवी आणि अंधेरी यांसारख्या भागात महागड्या निवासी मालमत्तांची अधिक विक्री झाली. मुंबईतील एकूण लक्झरी घरे तयार करण्यात २० टक्के वाटा एकट्या वरळीचा आहे.