Join us

घरांची मागणी वाढली, हातांना मिळाले काम; गृहनिर्माण क्षेत्रात २०३० पर्यंत १० कोटी लोकांना रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 8:16 AM

वाढती लोकसंख्या, वेगाने होत असणारे स्थलांतर तसेच नागरीकरण यामुळे घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील गृहनिर्माण क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. २०३० पर्यंत या क्षेत्रात सुमारे १० कोटी लोकांच्या हाताला काम मिळेल, असा अंदाज एका अभ्यासात वर्तविण्यात आला आहे. प्रॉपर्टी कन्सल्टन्सी नाइट फ्रँक आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड सर्व्हेअर्सच्या या संस्थांनी हा अहवाल प्रकाशित केला आहे. सध्या या क्षेत्रात ७.६ कोटी लोक कार्यरत आहेत. 

वाढती लोकसंख्या, वेगाने होत असणारे स्थलांतर तसेच नागरीकरण यामुळे घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच व्यावसायिक वापर, वेअर हाऊसिंग आणि आदरातिथ्य या क्षेत्राकडून मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने रिअल इस्टेट क्षेत्राला गती मिळाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग

गृहनिर्माण क्षेत्रातून होणारे एकूण उलाढाल २०३० पर्यंत १ ट्रीलियन डॉलर्सच्या घरात पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या ही उलाढाल ६५० अरब डॉलर इतकी आहे. 

या क्षेत्रातील कुशल कामगारांचे प्रमाण २०३० पर्यंत १०.५ टक्के होईल जे सध्या ९.७ टक्के इतके आहे. २०१२ नंतर गृहनिर्माण क्षेत्र दरवर्षी ११ टक्के या दराने वाढते आहे. 

देशातील गृहनिर्माण उद्योगाचा आकार एकूण अर्थव्यवस्थेच्या १८ टक्के इतका आहे. रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत कृषीनंतर या क्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो.

संबंधित क्षेत्रात मोठी मागणीरिअल इस्टेट व पायाभूत सुविधा या क्षेत्राशी संबंधित उद्योगांकडून कुशल मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. बांधकाम करणाऱ्या फर्म, फर्निचर आणि गृह सजावट उद्योग यातही कुशल कामगारांना मागणी आहे. याआधी शिक्षण, प्रशिक्षण उद्योगांकडून कुशल कामगारांची मागणी होत असे.

टॅग्स :बांधकाम उद्योग