Join us  

भाड्याच्या घरांची मागणी वाढली, पण पुरवठा कमी; मुंबई, पुण्यासह 'या' शहरांमध्ये रेंट महागलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 3:58 PM

देशातील आघाडीच्या शहरांमध्ये भाड्याच्या घरांच्या मागणीबरोबरच घर भाड्यातही मोठी वाढ झाली आहे.

देशातील आघाडीच्या शहरांमध्ये भाड्याच्या घरांच्या मागणीबरोबरच घर भाड्यातही सातत्यानं वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये भाड्याच्या घरांच्या वाढत्या मागणीत वाढ झाली आहे आणि त्यानुसार पुरवठा मात्र होत नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत घरभाडं महाग झालंय. रिअल इस्टेट मार्केटप्लेस मॅजिकब्रिक्सकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च तिमाहीत मागील तिमाहीच्या तुलनेत देशातील प्रमुख १३ बाजारपेठांमधील सरासरी घरभाडं ४.१ टक्क्यांनी वाढलं आहे.

घरभाडं वाढलंडिसेंबर तिमाहीच्या तुलनेत जानेवारी ते मार्च या कालावधीत गुरुग्राम, नोएडा, हैदराबाद आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये सरासरी भाडे अनुक्रमे ८.२ टक्के, ५.१ टक्के, ४.९ टक्के आणि ४.२ टक्क्यांनी वाढले आहे. प्रमुख १३ पैकी ११ बाजारपेठांमध्ये गेल्या तिमाहीत मोठी वाढ दिसून आली. ठाणे आणि अहमदाबादमध्येच घर भाड्यात घट झाली आहे. भाडे सतत वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी. जानेवारी-मार्च तिमाहीत १३ पैकी १२ शहरांमध्ये भाड्याच्या घरांची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त होती.

कोणत्या शहरात मागणी पुरवठा जास्तआयटी हब चेन्नई (१४.३ टक्के), बंगळुरू (१२.२ टक्के), हैदराबाद (१०.८ टक्के), पुणे (७.८ टक्के) येथे भाड्याच्या घरांची सर्वाधिक मागणी आहे. केवळ ग्रेटर नोएडा (-१०.३ टक्के), दिल्ली (-१.८ टक्के) आणि कोलकातामध्ये (-०.९ टक्के) 

मागणी कमी होती. मागणी कमी होऊनही केवळ नोएडामध्ये पुरवठा ४.२ टक्क्यांनी वाढला. तथापि, भाड्याच्या घरांची मागणी कमी होऊनही भाडे ५.१ टक्क्यांनी वाढलं. भारतीय रेंटल हाऊसिंग मार्केट झपाट्यानं सुधारणा होत असल्याची माहिती मॅजिकब्रिक्सचे सीईओ सुधीर पै यांनी दिली.

कुठे सर्वाधिक मागणी?देशातील या १३ शहरांमध्ये वार्षिक आधारावर भाड्याच्या घरांची मागणी ३.३ टक्क्यांनी वाढली आहे. पुरवठ्याबद्दल बोलायचं तर त्यात मात्र तब्बल १८ टक्क्यांची घट झाली. मागील महिन्यांतील ट्रेंड पाहता, बहुतांश लोकांची २ बीएचकेसाठी अधिक मागणी आहे. अशा लोकांची संख्या ४२ टक्क्यांहून अधिक आहे. यानंतर ३६ टक्के लोक ३ बीएचके आणि १७ टक्के लोक १ बीएचके घरांच्या शोधात होते. २०२३ च्या पहिल्या तिमाहीत ३ बीएचकेची मागणी ३६ टक्क्यांपर्यंत वाढली होती. २ बीएचकेची मागणी ४७ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर घसरली आहे.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनव्यवसाय