Join us

लग्नसराईच्या मागणीने सोन्याच्या भावात सुधार

By admin | Published: February 17, 2015 12:32 AM

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव ७० रुपयांनी वाढून २७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव ७० रुपयांनी वाढून २७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भाव सलग तिसऱ्या दिवशी २०० रुपयांनी वधारून ३८,९०० रुपये प्रतिकिलो राहिला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांकडून खरेदीचा मारा कायम राहिल्याने चांदीच्या भावात ही तेजी नोंदली गेली आहे.बाजार विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा भाव तेजीत राहिला. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांच्या खरेदीत मोठी वाढ नोंदली गेली.सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी वाढून १,२३३.८२ डॉलर प्रतिऔंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ७० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,७०० रुपये व २७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात गेल्या सत्रात ४० रुपयांची वाढ नोंदली गेली होती. दरम्यान, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव ५० रुपयांनी वाढून २३,७५० रुपयांवर आला. तयार चांदीचा भाव २०० रुपयांच्या तेजीसह ३८,९०० रुपये प्रतिकिलो व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही ९० रुपयांनी वाढून ३८,२७५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी उंचावून खरेदीकरिता ६२,००० रुपये व विक्रीसाठी ६३,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)