लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड-१९ विरोधी लसीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा पुरवठा वाढविण्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकेकडे केली आहे.
पुण्यात ५० एकरवर पसरलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पात दर मिनिटाला ५०० बाटल्या लस उत्पादित करण्याची क्षमता आहे. ॲस्ट्राझेन्काच्या लसीचे उत्पादन व वितरणाची परवानगी मिळाल्यानंतर मागील दोन महिन्यांत सीरमने जगातील ५१ देशांना ९१ दशलक्ष डोसची निर्यात केली आहे. तथापि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने संरक्षण उत्पादन कायद्यान्वये काही साहित्याच्या निर्यातीवर अलीकडेच निर्बंध घातले आहेत. त्यात लसीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेले ग्लोव्हज् आणि फिल्टर्स यांसारख्या काही वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंचा पुरवठा मर्यादित झाल्यामुळे लस उत्पादनावर परिणाम होत आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जागतिक बँकेच्या पॅनलवरून बोलताना पुनावाला यांनी सांगितले की, लस पुरवठ्याचा कोव्हॅक्स प्रकल्प विस्कळीत झाल्यास त्याला पूर्ववत करणे कोणालाही शक्य होणार नाही.