Join us  

Demat Account Updates: सेबीचा मोठा निर्णय! डीमॅट खातेधारकांना मोठा दिलासा; ‘या’ कामासाठी दिली मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:41 PM

सदर प्रक्रिया पूर्ण न केल्यास डीमॅट खाते बंद होऊ शकते, असा इशारा सेबीने दिला होता.

Demat Account Updates: शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिग करायचे असेल तर डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. आताच्या घडीला शेअर मार्केट कोसळताना दिसतोय. अदानी समूह, मंदीचे सावट यांसारख्या अन्य गोष्टींची भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच गुंतवणुकदारांचे हित लक्षात घेऊन सेबी अनेक नियमांमध्ये कठोरता आणताना दिसत आहे. मात्र, डीमॅट खातेधारकांसाठी सेबीने मोठा निर्णय घेतला असून, तो दिलासादायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. 

भांडवली बाजारात व्यवहार करण्यासाठी उघडण्यात येणारे ट्रेडिंग आणि डीमॅट खातेधारकांना नामनिर्देशनाची (नॉमिनी) नोंद किंवा नामनिर्देशन रद्द करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, सेबीने यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता नॉमिनी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने सप्टेंबर अखेरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कठोर अंमलबजावणीचा सेबीचा इशारा

शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी आदेश जारी केले होते. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांना सेबीच्या या आदेशाचे पालन करावे लागेल आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांचे डीमॅट खाते बंद केले जाऊ शकते, असे म्हटले होते. ट्रेडिंग आणि डीमॅट खात्यांसाठी नामनिर्देशनाची नोंदणी करणे अथवा हा पर्याय अस्वीकृत करणे यापैकी एक पर्याय स्वीकारणे गुंतवणूकदारांना आवश्यक आहे. हा पर्याय न स्वीकारल्यास ट्रेडिंग आणि डिमॅट खाते गोठवले जाईल, असा इशाराही ‘सेबी’ने दिला होता.  आता ही मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील मध्यस्थ अर्थात दलाल, दलाली पेढ्या आणि डिपॉझिटरी यांनी त्यांच्या ग्राहकांना वारस नोंदणीचा एक पर्याय स्वीकारण्याबाबत आठवण करून देणारे ई-मेल आणि एसएमएस पंधरवड्याच्या कालावधीत पाठवावेत, अशी सूचनाही ‘सेबी’ने केली होती.  

कशी करा डीमॅट खात्याची नॉमिनी प्रक्रिया

- तुमच्या डीमॅट खात्यात लॉग इन करा. यानंतर उघडणाऱ्या पेजच्या 'माय नॉमिनी' ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्ही 'ॲड नॉमिनी' किंवा 'ऑप्ट-आउट'चा ऑप्शन निवडू शकता. 

- नामनिर्देशित व्यक्तीचे तपशील फाइल करा आणि नॉमिनीचा आयडी पुरावा अपलोड करा.

- पुढे, 'टक्केवारी' मध्ये नॉमिनीचा हिस्सा प्रविष्ट करा. म्हणजे तुम्हाला नॉमिनीला किती टक्के वाटा द्यायचा आहे याचा तपशील तुम्हाला भरावा लागेल. 

- यानंतर कागदपत्रावर ई-स्वाक्षरी करा. ही प्रक्रिया आधार OTP द्वारे पूर्ण होऊ शकते.

- यानंतर दस्तऐवज पडताळणी केली जाईल आणि या प्रक्रियेसाठी २४ ते ४८ तासाचा कालावधी लागेल. 

दरम्यान, जुलै २०२१ मध्ये स्टॉक मार्केट नियामक संस्था, सेबीने विद्यमान पात्र ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना नामांकन करण्यासाठी सांगितले होते. आणि त्यासाठी मार्च २०२२ ही अंतिम मुदत होती मात्र, नंतर सेबीने प्रक्रिया पूर्ण करण्यास एक वर्षाची मुदत वाढ दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक