Tata Mototrs News :टाटा समुहातील प्रमुख कंपनी Tata Motors च्या बोर्डाने कंपनीच्या व्यवसायाचे दोन कंपन्यांमध्ये विभाजन करण्यास आणि दोन्ही कंपन्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये स्वतंत्र लिस्ट करण्यास मान्यता दिली आहे. टाटा मोटर्सने सांगितले की, डिमर्जरची प्रक्रिया येत्या 12 ते 15 महिन्यांत पूर्ण होईल. आर्थिक वर्ष 2024-25 च्या एप्रिल ते जून तिमाहीचे निकाल जाहीर करताना, टाटा मोटर्सने म्हटले की, "बोर्डाने टाटा मोटर्सच्या दोन स्वतंत्रपणे कंपन्यांच्या डिमर्जरच्या योजनेला मान्यता दिली आहे आणि डिमर्जर प्रक्रिया 12 ते 15 महिन्यात पूर्ण होईल. यावर्षी मार्च महिन्यात टाटा मोटर्सच्या बोर्डाने डिमर्जरचा निर्णय घेतला होता.
टाटा मोटर्सच्या डिमर्जरनंतर टाटा मोटर्सचा व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगळा होईल, तर प्रवासी वाहन व्यवसाय, इलेक्ट्रिकल वाहने, JLR आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणूक एकत्र करून एक स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाईल. डिमर्जर प्रक्रियेअंतर्गत, टाटा मोटर्सचे शेअर्स असलेल्या भागधारकांना टाटा मोटर्सच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहन कंपन्यांचे शेअर्स मिळतील.
टाटा मोटर्सच्या डिमर्जरचा निर्णय घेताना टाटा मोटर्सने म्हटले होते की, गेल्या काही वर्षांत टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहने, इलेक्ट्रिक वाहनांसह प्रवासी वाहने आणि जग्वार लँड रोव्हर रोव्हर व्यवसायाने अतिशय मजबूत कामगिरी दाखवली आहे. 2021 पासून दोन्ही विभाग आपापल्या सीईओंच्या देखरेखीखाली स्वतंत्रपणे काम करत आहेत. टाटा मोटर्सची ही डिमर्जर प्रक्रिया 2022 मध्ये प्रवासी आणि इलेक्ट्रिकल व्यवसायाच्या स्वतंत्र उपकंपन्या स्थापन करण्याच्या निर्णयाचा परिणाम आहे. टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की डिमर्जरच्या निर्णयामुळे भागधारकांचे मूल्य वाढेल. कंपनीने हेदेखील सांगितले की, टाटा मोटर्स फायनान्स आणि टाटा कॅपिटलच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू असून, ती 9 ते 12 महिन्यांत पूर्ण होईल.
टाटा मोटर्सच्या शेअरची स्थिती
टाटा समुहातील प्रमुख कंपनी Tata Motors च्या शेअर्सने एका महिन्यात 14% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. आजच्या व्यवहारात टाटा मोटर्सचा शेअर 1.06 टक्क्यांच्या घसरणीसह 1144 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, कंपनीच्या तिमाही रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 74 टक्क्यांनी वाढून 5,566 कोटी हीरुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 3,203 कोटी रुपये होता. एप्रिल-जूनमध्ये मिळालेला महसूल 5.7 टक्क्यांनी वाढून रु. 1.08 लाख कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी रु. 1.02 लाख कोटी होता.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)