Join us

शेअर बाजाराची ‘नभ’भरारी

By admin | Published: May 17, 2017 1:41 AM

शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रम नोंदविला गेला. मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार असल्याचे वृत्त धडकल्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रम नोंदविला गेला. मान्सून वेळेपूर्वीच दाखल होणार असल्याचे वृत्त धडकल्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून येत आहे. शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ३०,५८२ या नव्या उच्चांकावर बंद झाला आणि निफ्टीने ९५०० चा आकडा पार केला. हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, मान्सून निकोबार व्दीपसमूह आणि संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. याचा परिणाम म्हणून आज शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स ३०,५९१.५५ अंकापर्यंत पोहचला. आतापर्यंतचा हा सर्वोत्तम उच्चस्तर आहे. यापूर्वी ११ मे रोजी सेन्सेक्स ३०,३६६.४३ अंकांच्या उच्चांकावर होता. अखेर सेन्सेक्स २६०.४८ अंकांनी किंवा ०.८६ टक्क्याने वाढून ३०,५८२.६० वर बंद झाला. सोमवारी सेन्सेक्स ३०,३२२.१२ वर बंद झाला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ९,५१७.२० अंकापर्यंत पोहचला. अखेरीस निफ्टी ६६.८५ अंक किंवा ०.७१ टक्क्यांच्या वाढीसह ९५१२.२५ अंकावर बंद झाला. निफ्टी सोमवारी ९४४५.४० अंकावर बंद झाला होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणुकदारांनी २३५.३३ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. स्थानिक गुंतवणुकदारांनी ६५.७७ कोटी रुपयांचे शेअर विक्री केले. जियोजित फायनान्सियल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, मान्सून लवकर येणार असल्याच्या वृत्ताने शेअर बाजारात उत्साह आहे. सेन्सेक्स नव्या उच्चांकावर पोहचला आहे. दूरसंचार, आयटी आणि फार्मा या क्षेत्रातही तेजी दिसून येत आहे. दरम्यान, आशियाच्या बाजारात चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांचा लाभ ०.२० ते ०.७४ टक्के राहिला तर हाँगकाँग, सिंगापूर आणि ताइवानमध्ये ०.०५ ते १.१२ टक्के घसरण झाली. हीरो मोटोकार्प ३.०९ टक्क्यांनी वाढला, भारती एअरटेल २.९८ टक्के, टीसीएस २.६६ टक्के, आयटीसी २.२० टक्के, एसबीआय २.१८ टक्के, मारुति २.०५ टक्के, डॉ. रेड्डीज १.७५ टक्के, विप्रो १.६९ टक्के आणि हिंदुस्थान यूनिलिव्हरमध्ये १.५० टक्के लाभ दिसून आला.