सणासुदीचे दिवस अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. काय खरेदी करावं, काय खरेदी करू नये, खर्च कसा टाळावा, विकत घेतलेल्या साहित्यातूनही नफा कसा व्हावा, यासंदर्भात सध्या सर्वजण विचारांची गुंतवणूक करण्यात मग्न असतील. जर तुम्ही सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ते घरात सांभाळून ठेवण्याऐवजी एका सुरक्षित आणि आर्थिकदृष्टीनं फायदेशीर ठरेल अशा ठिकाणी ठेवा. आता तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बँक लॉकरसंदर्भात माहिती दिली जाईल. पण तसे नाहीय.
भारतीय स्टेट बँकेनं एक भन्नाट स्कीम ग्राहकांसाठी आणलीय, या स्कीममुळे तुमचं केवळ 'सोनंसोनं'च होणार आहे. एसबीआयच्या या स्कीम अंतर्गत सोने जमा केल्यास, त्यास सुरक्षा पुरवली जाईलच, शिवाय जमा केलेल्या सोन्यावर व्याजही मिळणार आहे. या स्कीमचा पुरेपुर फायदा घेण्यासाठी तुम्हाला एसबीआयच्या रीवॅन्प्ड गोल्ड डिपोझिट स्कीम (R- GDS) अंतर्गत आपले सोने ठेवावे लागेल.
1. काय आहे R- GDS स्कीम?
रीवॅन्प्ड गोल्ड डिपोझिट स्कीम (R- GDS) फिक्स्ड डिपोझिट स्कीम आहे. पण, येथे तुम्हाला पैशांऐवजी सोने जमा करावे लागतात. या स्कीमनुसार, जमा केलेल्या सोन्याला सुरक्षा पुरवली जाते आणि त्यावर व्याजही मिळते.
2. कोणकोण घेऊ शकणार याचा फायदा?
या स्कीमचा फायदा केवळ भारतातील नागरिकच घेऊ शकतात. यामध्ये वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरुपात सोने जमा केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त प्रोप्रायटरशिप व पार्टनरशिप फर्म, म्युचुअल फंड/एक्सचेंज ट्रेडेड फंड्ससहीत अन्य जे सेबीमध्ये नोंदणीकृत ट्रस्ट्स देखील सोने जमा करू शकतात.
3. किती प्रमाणात सोने जमा करावे लागेल?
या स्कीमअंतर्गत तुम्हाला कमीतकमी 30 ग्रॅम सोने जमा करावे लागेल. याशिवाय, तुमच्या इच्छेनुसार जास्तीत-जास्त सोनेदेखील जमा करता येऊ शकणार आहे.
4. वेळेची मर्यादा?
तीन प्रकारची डिपोझिट खाती तुमच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत,
अ. शॉर्ट टर्म डिपोझिट (STBD)
- 1 ते 3 वर्षांपर्यंत सोने जमा करता येऊ शकते.
ब. मीडियम टर्म गव्हर्नमेंट डिपोजिट (MTGD)
5 ते 7 वर्षांपर्यंत सोने जमा करता येऊ शकते.
क. लाँग टर्म गव्हर्नमेंट डिपोजिट (LTGD)
12 ते 15 वर्षांपर्यंत सोने जमा करता येऊ शकते.
5. व्याज किती मिळणार ?
- शॉर्ट टर्म बँक डिपोझिटवर तुम्हाला 1 वर्षासाठी 0.5 टक्के व्याज मिळेल. 1 ते 2 वर्षांसाठी 0.55 टक्के व्याज मिळणार.
- 2 ते 3 वर्षांसाठी 0.60 टक्के व्याज मिळणार
- लाँग टर्म गव्हर्नमेंट डिपोजिट स्कीमसाठी 2.25 टक्के व्याज दरवर्षी देण्यात येईल
6. कसे मिळणार व्याज?
शॉर्ट टर्म डिपोझिटमध्ये, जेवढ्या प्रमाणात सोने जमा केलेले असेल त्याच स्वरुपात व्याज दिले जाईल. पण अन्य दोन डिपोझिट्समध्ये रुपयांमध्ये व्याज तुमच्या खात्यात जमा केले जाईल. प्रत्येक वर्षाच्या 31 मार्चला खात्यात पैसे जमा केली जातील.
7. सोनं कसं जमा करावं?
गोल्ड बार, शिक्के, दागिन्यांच्या स्वरुपात सोने जमा करावे. मात्र, यामध्ये स्टोन्स किंवा अन्य धातूंचा समावेश करण्यात आलेला नाही. या स्कीम अंतर्गत सोने जमा करण्यासाठी अर्ज, ओळख पत्र, राहत्या ठिकाणाचा पुरावा आणि यादी अर्ज भरावा लागेल
8. नियोजित वेळेपूर्वी रक्कम काढणे शक्य?
मॅचुरिटीपूर्वीच तुम्हाला सोने खात्यातून काढायचे असल्यास, त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागतील. एसटीबीडी अंतर्गत 1 वर्षानंतर सोने पुन्हा ताब्यात घेतलं जाऊ शकतं. पण यासाठी तुम्हाला दंडदेखील भरावा लागेल.
एमटीजीडी अंतर्गत जमा झालेली रक्कम 3 वर्षांनंतर काढता येईल.
एलटीजीडी स्कीमच्या अटींनुसार, 5 वर्षांनंतर रक्कम काढता येणं शक्य आहे. पण दोन्हींमध्ये दंड भरावा लागणार आहे.
9. सर्व शाखांमध्ये खाते उघडता येईल?
या स्कीम अंतर्गत डिपोझिट खाते उघडायचे असेल तर काही निवडक बँक शाखांमध्येच ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. एसबीआयच्या वेबसाइटवर यासंबंधी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
10. ही महत्त्वपूर्ण बाब समजून घ्या
सोने जमा करण्यासंबंधीच्या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती करुन घ्या. शिवाय, तुमच्या गरजांनुसार या स्कीममुळे तुम्हाला खरंच फायदा होणार आहे का?, हे देखील पडताळून पाहा