नवी दिल्ली: चालु आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. काही कामे किंवा गोष्टी या करणे अनिवार्य ठरते. अन्यथा सदर सेवा, योजना बंद होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे न विसरता काही काही गोष्टी करणे अनिवार्य ठरते. वार्षिक बचत योजनांमध्ये दरवर्षी ठराविक रक्कम जमा करावी लागते. आणि ती रक्कम चालु आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पैसे जमा न केल्यास खाते बंद होण्याची नामुष्की ओढवली जाऊ शकते, असे सांगितले जाते.
या योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) यांचा समावेश आहे. जर तुम्ही यापैकी कोणतीही एक योजना किंवा एकापेक्षा जास्त योजना घेतल्या असतील, तर तुमच्यासाठी ३१ मार्चपूर्वी या योजनांमध्ये ठराविक रक्कम जमा करणे फार महत्वाचे आहे अन्यथा तुमचे खाते बंद केले जाईल किंवा निष्क्रिय केले जाईल, असे म्हटले जाते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
एका आर्थिक वर्षात म्हणजेच ३१ मार्चपर्यंत तुम्हाला तुमच्या पीपीएफ (PPF) खात्यात किमान ५०० रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही ३१ मार्चपर्यंत तुमच्या पीपीएफ खात्यात पैसे जमा करू शकला नाही, तर तुम्हाला ५० रुपये दंड भरावा लागेल. जितक्या वर्षांसाठी तुम्ही किमान रक्कम भरणार नाही, तितकीच वर्षे आणि किमान रक्कम तुम्हाला दंड म्हणून भरावा लागेल. तसेच तुम्ही किमान रक्कम न भरलेल्या वर्षांसाठी तुमचे खाते निष्क्रिय मानले जाईल. निष्क्रिय खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर्ज आणि पैसे काढण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
ही योजना चालू ठेवण्यासाठी दरवर्षी किमान २५० रुपये जमा करावे लागतील, ज्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. तुम्ही किमान रक्कम जमा न केल्यास तुमचे खाते डिफॉल्ट होईल. तुम्ही तुमचे खाते फक्त १५ वर्षांच्या कालावधीसाठी नियमित करू शकता, पण खाते नियमित करण्यासाठी तुम्हाला वार्षिक ५० रुपये दंड आणि किमान रक्कम भरावी लागेल.
नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)
नॅशनल पेन्शन सिस्टम या योजनेत ३१ मार्चपूर्वी टियर १ शहरांमध्ये राहणाऱ्या खातेधारकांना दरवर्षी १००० रुपये जमा करावे लागतात. जर त्याने तसे केले नाही, तर सध्याच्या नियमांनुसार त्याचे खाते निष्क्रिय होईल आणि त्याने किती वर्षे पैसे दिले नाहीत, त्यानुसार दरवर्षी किमान १०० रुपये दंड स्वरुपात भरावे लागतील. महत्वाची गोष्ट म्हणजे टियर १ शहरांशिवाय कोणत्याही किमान पेमेंटची आवश्यकता नाही.