Join us  

ठेवी घटल्या; कर्ज वाढले! बँकांना भांडवल टंचाई भासण्याची शक्यता; ग्राहकांचा फायदाच फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 6:04 AM

बँक ठेवीतील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. आरबीआय रेपो दरात वाढ करणार असल्याने बँका ठेवींवर अधिक व्याज देण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतातील कर्ज मागणी वाढून तीन वर्षांच्या उच्चांकावर गेली असून, आर्थिक घडामोडी वेगवान झाल्यामुळे ती आणखी वाढतच आहे. त्या तुलनेत ठेवींमधील वाढ मात्र मंद आहे. त्यामुळे येत्या काळात बँकांना भांडवलाची टंचाई भासू शकते. त्यातून ठेवींचे व्याज दर वाढतील, असे विश्लेषकांनी म्हटले आहे.

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले की, वाढत्या महागाईमुळे आर्थिक वृद्धी मंदावली आहे. तसेच बचत कमी झाली आहे. त्यातच अधिक परताव्याच्या शोधार्थ लोक समभाग व म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे बँक ठेवीतील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. आरबीआय रेपो दरात वाढ करणार असल्याने बँका ठेवींवर अधिक व्याज देण्याची शक्यता आहे.

अधिक व्याज देण्यास सुरुवातठेवीत वाढ व्हावी यासाठी एचडीएफसी बँकेने अनिवासी भारतीयांसाठी अल्प मुदतीच्या ठेवींवर अधिक व्याज देण्यास सुरुवात केली आहे. इतर बँकाही याची पुनरावृत्ती करू शकतात. पतमापन संस्था इक्राने गेल्या आठवड्यात म्हटले होते की, भारतीय बँका ठेवींवरील व्याज दर आक्रमकतेने वाढवू शकतात.

बँका काय करताहेत? बँकांच्या नफ्यावर आधीच ताण आला आहे. त्यामुळे बँका निधी मिळविण्यासाठी ठेवींवरील व्याज वाढवतीलच, पण त्याचबरोबर भांडवली बाजारातूनही निधी उभा करतील, असे दिसते. २०२१ मध्ये कर्ज मागणी होती. कोरोनामुळे त्यात घट झाली होती.

टॅग्स :बँक