नवी दिल्ली : आशियातील उगवत्या अर्थव्यवस्थांच्या चलनातील वाढती कमजोरी चिंताजनक आहे, असा इशारा ‘मूडीज ॲनालिटिक्स’ने दिला आहे. याबाबतीत सर्वाधिक धोका भारताला असून, रुपया आणि इतर चलने अशीच घसरत राहिली तर वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांवर प्रतिकूल परिणाम होईल, असे ‘मूडीज’ने म्हटले आहे.
‘मूडीज’ने म्हटले आहे की, रुपयातील कमजोरीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीला ब्रेक लागू शकतो. भारतीय रुपया सुमारे एक वर्षापासून सातत्याने घसरत आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपया वारंवार सार्वकालिक नीचांकावर घसरत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये रुपया पहिल्यांदाच ८३ च्या खाली घसरला होता. अजूनही १ डॉलरची किंमत ८२ रुपयांवर आहे.
‘मूडीज’ने म्हटले की, रुपयाची स्थिती सुधारली नाही, तर घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला निर्णय घ्यावा लागेल. त्यानुसार, व्याजदरात वाढ करावी लागू शकते.