Join us

भारीच! कोरोना संकटातही 'या' क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा पगार दुप्पट वाढला, जाणून घ्या, किती फायदा झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 8:28 AM

Coivd 19 Pandemic Double Salary : कोरोना लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. तसेच काहींच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. बहुतांश क्षेत्रात पगाराच्या वाढीच्या उलट कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - गेल्या वर्षभराहून अधिक काळ देश कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांचा आकडा हा तब्बल दोन कोटींवर पोहोचला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. तसेच काहींच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. बहुतांश क्षेत्रात पगाराच्या वाढीच्या उलट कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. 

कोरोनामुळे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये देखील प्रमोशन, पगारवाढ थांबवण्यात आली आहे. मात्र एक असं क्षेत्र आहे, जिथे कोरोनाच्या संकटातही कर्मचाऱ्यांचा पगार वाढला आहे. कोरोना असताना देखील आयटी क्षेत्रात  (IT Sector)  काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. हे महत्त्वाचे पाऊल स्पर्धेत टिकून राहणे आणि मार्केटमधील प्रतिभा टिकवून ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पट वाढ झाली आहे. 

एक्सेंचर इंडिया (Accenture India)

सध्या एक्सेंचर इंडियामध्ये 2 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, बोनस आणि प्रमोशन दिलं होतं. यंदा फेब्रुवारीमध्ये वाढ आणि पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यावर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांना थँक यू बोनस मिळाला आहे. कंपनीने 605 कर्मचार्‍यांना व्यवस्थापकीय संचालक (MD) पदावर पदोन्नती दिली, त्यातील 63 पदांवर वरिष्ठ एमडी पदावर पदोन्नती झाली.

टीसीएस (TCS)

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 6 महिन्यांच्या कालावधीत कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये दोनदा वाढ केली. कंपनीने एप्रिल 2021 पासून आपल्या सर्व कर्मचार्‍यांना सुधारित वेतन देणे सुरू केले.

टेक महिंद्रा (Tech Mahindra)

आयटी क्षेत्रातील कंपनी टेक महिंद्राने (Tech Mahindra) कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करण्याची घोषणा केली. ती 1 एप्रिल 2021 पासून अंमलात आली. कंपनीने आपल्या हुशार कर्मचाऱ्यांना रिटेंशन बोनसही जाहीर केला.

इन्फोसिस (Infosys)

देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) कर्मचाऱ्यांच्या भरपाईची समीक्षा दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती दिली. कंपनीने जानेवारी 2021 पासून आपल्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ केली. गेल्या वर्षी कंपनीने आपल्या बर्‍याच कर्मचाऱ्यांची वाढ थांबवली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :माहिती तंत्रज्ञानकोरोना वायरस बातम्याभारतटाटाइन्फोसिसपैसा