नवी दिल्ली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या दिवशीही मंगळवारी सोन्याला उठाव नसल्यामुळे येथील बाजारात त्याची किंमत १० ग्रॅममागे १०० रुपयांनी घटून २७,१०० रुपये झाली. सोन्याला जागतिक पातळीवरही उत्साहवर्धक अशी मागणी नसण्याचाही परिणाम झाला. चांदीलाही औद्योगिक पट्ट्यातून व नाणे उद्योगातून मागणी नसल्यामुळे किलोमागे ती ५६० रुपयांनी कमी होऊन ३६,४४० रुपयांवर आली.राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव १० ग्रॅममागे १०० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,१०० व २६,९५० रुपये झाला. सोने सोमवारी १२५ रुपयांनी वधारले होते, तर गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला सोन्याचा भाव १० ग्रॅमला ३०,३९० रुपये होता. आठ ग्रॅमचे सोन्याचे नाणे मर्यादित व्यवहारांत २३,७०० रुपये होते. अक्षयतृतीया असूनही एकूण व्यवहारात सोन्याचा भाव नरमाईचाच राहिला, असे येथील सराफ राकेश आनंद यांनी सांगितले. सोन्याच्या भावातील घटीचाच कल चांदीच्या भावातही राहिला. चांदी किलोमागे ५६० रुपयांनी घटून ३६,४४० रुपयांवर आली. चांदीच्या नाणे खरेदीत (१०० नग) एक हजार रुपयांनी घट होऊन तो भाव ५५,०००, तर विक्रीचा भाव ५६ हजार रुपयांवर आला होता.
अक्षयतृतीया असूनही सोने झळाळले नाही, झाकोळले
By admin | Published: April 22, 2015 2:52 AM