Join us

घोटाळ्यात साधू आणि त्रिकूट! अनेक गोष्टी दिसूनही ‘सेबी’कडून डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 6:48 AM

अधिक चौकशी करण्याची होतेय मागणी, हे तिघेही अतिशय हुशार व्यावसायिक आहेत. चित्रा या वरून अगदी नम्र, साध्या चेहऱ्याच्या होत्या.

मुंबई : शेअर बाजारातील घोटाळ्यातून कमी बजेटचा बॉलिवूड चित्रपट तयार होईल, अशा मनोरंजक कथा समोर येत आहेत. साधूच्या सांगण्यावरून राष्ट्रीय शेअर बाजारात निर्णय घेणाऱ्या ‘एनएसई’च्या माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण, १५ लाखांवरून थेट ४ कोटी २१ लाखांचा पगार घेणारा आनंद सुब्रमण्यम यांच्यानंतर या प्रकरणात सुनीता आनंद या महिलेचा समावेश झाला आहे.

‘सेबी’ने या प्रकरणात अतिशय वरवरची कारवाई करीत आपले हात झटकले आहेत. मात्र या घोटाळ्यात अनेक गोष्टी दिसूनही त्या नजरेआड करण्यात आल्या आहेत. चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यम आणि सुनीता आनंद या त्रिकुटाची ‘सेबी’ने अधिक बारकाईने चौकशी करण्याची गरज असल्याचे ‘एनएसई’मधील सूत्रांनी माहिती देताना सांगितले. आनंद सुब्रमण्यम हा जीओओ तर  चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार होता. सुनीता या आनंद सुब्रमण्यम यांच्या पत्नी आहेत. साधू आणि सुनीता यांच्या सांगण्यावरून चित्रा यांनी सुब्रमण्यमला १५ लाखांवरून ४ कोटी २१ रुपयांचा पगार दिला, असे सेबीने म्हटले आहे. तर चित्रा या अध्यक्षपदावर असताना तब्बल १० कोटी ५६ लाख रुपये पगार घेत होत्या असेही समोर आले आहे.

साधाभोळा चेहरा; मात्र अत्यंत चलाखहे तिघेही अतिशय हुशार व्यावसायिक आहेत. चित्रा या वरून अगदी नम्र, साध्या चेहऱ्याच्या होत्या. मात्र त्यांना जवळून ओळखणाऱ्यांचा असा विश्वास आहे की, त्या खूप चलाख आणि वरपर्यंत ओळख असणाऱ्या होत्या, असे सूत्रांनी सांगितले. चित्रा आणि या दोघांनी दिल्लीतील नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी घट्ट नाते निर्माण केले होते. दिल्लीतील त्यांच्या ओळखींमुळे ‘सेबी’कडून कठोर कारवाई करण्यात आली नाही, असा दावा सूत्रांनी केला आहे.

सर्व व्यवहारांची साधूला दिली माहितीचित्रा रामकृष्ण यांनी राष्ट्रीय शेअर बाजारातील आर्थिक व्यवहार, गोपनीय माहिती, व्यवसाय योजना, मिळणारा फायदा यांसह सर्व माहिती साधूला दिली होती. तसेच शेअर बाजारामध्ये कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचाही निर्णय त्यांनी साधूच्या सल्ल्याने घेतला, असे सेबीच्या आदेशात म्हटले आहे. एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ दरम्यान चित्रा यांनी ‘एनएसई’च्या अध्यक्ष आणि सीईओ म्हणून काम पाहिले होते.

एनएसईने केले हात वरचित्रा अध्यक्ष पदावरून पायऊतार होऊन ६ वर्षे झाली आहेत. तेव्हापासून एनएसईचे बोर्ड, व्यवस्थापन आणि ऑपरेशनल स्ट्रक्चर्समध्ये पूर्णपणे बदल करण्यात आला आहे, असे राष्टीय शेअर बाजाराने म्हटले आहे. 

टॅग्स :शेअर बाजार