नवी दिल्ली : यावर्षी सोन्याची चमक चांगलीच वाढली आहे. उच्चांकी दरवाढीमुळे ताेळ्याला ६२ हजार रुपयांपेक्षा जास्त दर काही दिवसांपूर्वी गेला हाेता. मात्र, भाववाढ तसेच सततच्या उतार-चढावामुळे साेन्याची मागणी १७ टक्क्यांनी घटली आहे. मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत ११२ टन एवढी मागणी हाेती. याचा साेने आयातीवर माेठा परिणाम झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २४ टक्क्यांनी आयात घटून ३५ अब्ज डाॅलरवर आली आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत साेन्याची मागणी १३५.५ टन हाेती. यावर्षी मागणी आणखी घटण्याचा अंदाज आहे. साेन्याच्या दागिन्यांचीही मागणी ९४ टनांच्या तुलनेत घटून ७८ टन एवढी होती. वाढलेल्या किमतीचा फटका बसला आहे. रत्न आणि दागिन्यांची निर्यात ३ टक्क्यांनी घटून ३८ अब्ज डॉलर एवढी झाली आहे.
५ वर्षात दुप्पटहून अधिक वाढले भाव
पाच वर्षातील सोन्याचे भाव पाहता ते दुप्पटपेक्षा अधिक झाले आहे. २०१८मध्ये सोने ३०,३०० रुपयांवर होते. ते थेट ६२,१०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. या ५ वर्षात कोरोना काळात सर्वाधिक वाढ झाली.
६०० टन सोन्याची आयात
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ मध्ये ६०० टन साेन्याची आयात केली.
चांदीची आयात वाढली
सोन्याच्या तुलनेत चांदीची मागणी वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आयात ६.१२ टक्क्यांनी वाढून ५.२९ अब्ज डॉलर एवढी चांदी आयात झाली.
आयात शुल्क वाढल्यामुळे आयात कमी झाली. मार्च २०२३मध्ये त्यात वाढ झाली, तरीही त्याचा फार प्रभाव पडला नाही. आयात शुल्क १०.७५ टक्क्यांवरून १५% केले आहे.