जळगाव : विजयादशमीपाठोपाठ धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरदेखील सोने- चांदीचे भाव वाढले तरी खरेदीसाठी शनिवारी मोठा उत्साह दिसून आला. धनत्रयोदशीचा मुहूर्त शनिवार व रविवारी असल्याने रविवारीदेखील मोठी खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शनिवारी एकट्या सुवर्णनगरी जळगावात १५ कोटींच्या पुढे उलाढाल झाल्याचा अंदाज असून, राज्यात हा आकडा दोन ते अडीच हजार कोटींच्या घरात गेल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, शनिवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ५१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. तसेच चांदीच्याही भावात दोन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती ५९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. साडेतीन मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसह सोने- चांदी खरेदीलाही मोठे महत्त्व दिले जाते. यासोबतच धनत्रयोदशीलादेखील सोने खरेदीला अनन्य महत्त्व असल्याने या दिवशी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. तो उत्साह यंदाही कायम तर आहेच, शिवाय यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने खरेदी अधिक वाढली असल्याचे चित्र सुवर्णबाजारात आहे.
सध्या कलाकुसरीच्या दागिन्यांना अधिक पसंती असल्याने मनाजोगे दागिने भेटण्यासाठी ग्राहकांकडून बुकिंगदेखील करून ठेवली गेलीहोती. रविवारीदेखील सोन्याच्या खरेदीचा उत्साह असाच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन दिवसात राज्यभरात सोन्यामध्ये चार ते पाच हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविलाजात आहे.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शनिवारी मोठा प्रतिसाद मिळाला व त्यात रविवारीदेखील मुहूर्त असल्याने या दिवशीदेखील मोठी खरेदी होऊ शकते. शनिवारी जळगावात १५ कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. - भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक