लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: देशातील नागरिकांना अन्नधान्य पुरवठा कमी पडू नये यासाठी केंद्र सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर आटा, मैदा, रवा आणि तुकडा बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. साखरेच्या निर्यातीवर १.१२ कोटी टनांची मर्यादा घालण्यात आली तरीही २०२२-२३ मध्ये भारताची कृषी निर्यात २० टक्क्यांनी वाढली आहे.
‘डीजीसीआयएस’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या काळात भारताची कृषी निर्यात २३ अब्ज डॉलर म्हणजेच १.९९ लाख कोटी रुपये राहिली. मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत ती २० टक्के अधिक आहे. केंद्राच्या निर्बंधांमुळे २०२२-२३ च्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच सप्टेंबर ते मार्च या कालावधीत मात्र निर्यातीत घसरण झाली आहे. ४७० अब्ज डॉलर म्हणजेच ३८.५ लाख कोटी रुपये निर्यातीचे लक्ष्य २०२२-२३ साठी निर्धारित केले.
गहू स्वस्त-तांदूळ महाग
निर्यातीवर निर्बंध घातल्याने केंद्र सरकारने निर्धारित केलेले ४७० अब्ज डॉलर म्हणजे ३८.५ लाख कोटी रुपयांचे निर्यात लक्ष्य गाठण्यास अडथळे येणार आहेत. निर्बंध घातल्यानंतरही सणासुदीमध्ये गव्हाच्या किमतीत चार टक्क्यांची वाढ झाली आहे, तर बासमती तांदळाची किंमत १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. बासमती तांदूळ वगळता इतर तांदूळ पाच टक्क्यांनी स्वस्त झाला आहे.
कांदा नाही रडवणार
साठवण क्षमतेत सुधारणा, तसेच उत्पादनातील वाढ यामुळे ऑक्टोबर-डिसेंबर या काळात यंदा कांदा ग्राहकांना रडवणार नाही. लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या किमती गेल्यावर्षीच्या तुलनेत २० % कमी आहेत. कांद्याचा सध्याचा भाव प्रतिक्विंटल १,२२० रुपये आहे. गेल्यावर्षी तो २,३५४ रुपये होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"