Dhanteras Gold Coin Shopping : आज देशभरात धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. या दिवशी सोन्या-चांदीपासून वाहने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडी आदी सर्व प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येते. मात्र, प्रत्येकालाच दिवाळीत सुट्टी मिळतेच असं नाही. त्यामुळे अनेकांना खरेदीची हौस भागवता येत नाही. मात्र, आता लोक ऑनलाईन खरेदी करुन दुधाची भूक ताकावर भागवत आहेत. आजकाल ऑनलाईन वेबसाईट्सवर साडीच्या सेफ्टी पिनपासून सॅटेलाईटच्या डिशपर्यंत सर्वकाही मिळत आहे. आता ग्राहकांना सोने-चांदी खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध झाला असून याद्वारे तुम्ही घरबसल्या सोन्या-चांदीची नाणी, बिस्किटे आदी ऑर्डर करू शकता. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सोने तुमच्या घरी पोहोचेल.
स्विगी, ब्लिंकिट आणि बिग बास्केट १० मिनिटांत देतंय होम डिलिव्हरी
धनत्रयोदशीच्या दिवशी, स्विगी, ब्लिंकिट आणि बिग बास्केट सारखे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी सोन्या-चांदीच्या नाण्यांपासून बिस्किटे आणि ०.५० ग्रॅम सोन्याची नाणी होम डिलिव्हरी करत आहेत.
बिग बास्केटची तनिष्कसोबत हातमिळवणी
बिग बास्केटने सोन्या-चांदीच्या मोठ्या ब्रँड तनिष्कशी हातमिळवणी केली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला सोन्या-चांदीची नाणी घरपोच मिळू शकतात. बिग बास्केटवरुन तुम्ही तनिष्क ब्रँडचे लक्ष्मी-गणेश (९९९.९ शुद्धता) चांदीची नाणी, तनिष्कचे २२ कॅरेट असलेले १ ग्रॅम सोन्याचे नाणे मागवू शकता. हे सर्व १० मिनिटांत तुमच्या घरी पोहचणार आहे.
स्विगी इंस्टामार्ट आणि ब्लिंकिटद्वारे सोन्याचे नाणे खरेदी करा
ब्लिंकिटद्वारे सोन्याची नाणी खरेदी केल्यास, तुम्हाला १० मिनिटे वाट पाहण्याची गरज नाही. कारण काही ठिकाणी सोन्या-चांदीची नाणी ८ मिनिटांत पोहचवली आहेत. ब्लिंकिटच्या अॅपवरुन तुम्ही सर्व प्रकारची सोन्याची आणि चांदीची नाणी खरेदी करू शकता. फूड डिलिव्हरीमुळे क्विक-कॉमर्स क्षेत्रात झपाट्याने वाढणारी कंपनी स्विगी इंस्टामार्ट देखील आपल्या ग्राहकांना १०-१५ मिनिटांत सोन्या-चांदीची नाणी पोहचवत आहे.
अॅमेझॉनही देतंय बंपर ऑफर्स
तुम्ही अॅमेझॉनवरुन आता सोने-चांदी खरेदी करू शकता. सणासुदीला सोने-चांदीची नाणी भेट देण्यासाठी चांगली समजली जातात. तुम्हाला अनेक ज्वेलरी ब्रँड आणि ज्वेलर्सच्या मोठ्या ब्रँडची नाणी आणि बिस्किटे खरेदी करण्याची संधी आहे.