DHFL Scam: दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (DHFL) चे माजी संचालक धीरज वाधवान (Dheeraj Wadhawan) ला मोठा झटका बसला आहे. 34,000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी सीबीआयने (CBI) वाधवानला ताब्यात घेतले आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी(दि.13) सायंकाळीच धीरज वाधवानला मुंबईतून अटक करण्यात आले होते. यानंतर त्याला मंगळवारी दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानणी केली. दरम्यान, सीबीआयने 2022 मध्येच या खटल्याच्या संदर्भात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती, पण सध्या ते जामीनावर होते.
34615 कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोपतपास यंत्रणेने जून 2022 मध्ये 34000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या 17 बँकांच्या समूहाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. या 17 बँकांच्या गटाचे नेतृत्व युनियन बँक ऑफ इंडियाकडे होते. या तक्रारीवरून वाधवान व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींनी 2010 ते 2018 दरम्यान डीएचएफएलला 42,781 कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा दिल्या होत्या. एजन्सीने आपल्या आरोपपत्रात म्हटले की, कपिल आणि धीरज वाधवान आणि इतरांनी मिळून हेराफेरी केली आणि मे 2019 पासून कर्जाचं पेमेंट डिफॉल्ट करून 34,615 कोटी रुपयांची फसवणूक केली.