नवी दिल्ली : धूत ट्रान्समिशन प्रा. लि. कंपनीला इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘डून अँड ब्रॅडस्ट्रीट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कंपनी गेल्या १४ वर्षांपासून वाहन आणि वस्तू उत्पादन क्षेत्राला लागणाऱ्या वायरिंग हार्नेसेस, इलेक्ट्रॉनिक सेंसर्स आणि कंट्रोलर्स, पॉवर सप्लायर कॉर्डस्, केबल, उच्च दर्जाची अचूकता असलेल्या नॉन फेरस स्टॅम्पिंग आणि इंजिनिअरिंग प्लास्टिक सुटे भाग बनविते. धूत ट्रान्समिशन संशोधन आणि विकास तसेच वैधता सुविधा यामध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आली आहे. आगामी काळात ही गुंतवणूक आणखी वाढविण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीचे सध्या देशातील १0 ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि पुणे येथे कंपनीचे प्रकल्प आहेत. याशिवाय चेन्नई आणि गुरगावातही कंपनीचे प्रकल्प आहेत. याशिवाय कंपनीची ब्रिटनमध्ये संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. स्लोव्हाकिया आणि व्हिएटनाम या देशांत अनुक्रमे २0१६ आणि २0१७ मध्ये कंपनीचे प्रकल्प सुरू होतील. धूत ट्रान्समिशनला निर्यात क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ईईपीसी पुरस्कारही मिळाला आहे. कंपनी आपल्या उत्पादनापैकी १२ टक्के उत्पादन ब्रिटन, युरोप आणि जपान या देशांना निर्यात करते. राहुल धूत यांनी केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार सोहळ्यास उद्योग क्षेत्रातील तसेच सरकार आणि अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
धूत ट्रान्समिशनला पुरस्कार
By admin | Published: November 24, 2015 11:45 PM