मुंबई : धूत ट्रान्समिशन प्रा. लि. (डीटीपीएल) कंपनीने बर्ग इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. या नावाने नवी कंपनी सुरू केली असून, ही कंपनी झपाट्याने वाढणाऱ्या ‘हेल्थ अँड वेलनेस’ उद्योग क्षेत्रात काम करणार आहे. कंपनीचे ओझोनमुक्त हवा शुद्धीकरण उपकरण लवकरच बाजारात येणार आहे. जगातील सहा देशांत अस्तित्व असलेल्या ‘धूत ट्रान्समिशन’ने जारी केलेल्या माहितीनुसार, नव्या उद्यमास देण्यात आलेले ‘बर्ग इलेक्ट्रॉनिक्स’ हे जर्मन भाषेतील नाव असून, ‘हमी’ असा त्याचा अर्थ आहे. कंपनी आरोग्य क्षेत्रातील सुरक्षित, किफायतशीर, अत्याधुनिक आणि नावीन्यपूर्ण उपकरणे उत्पादित करणार आहे. बर्ग इलेक्ट्रॉनिक्स लवकरच आपले पहिले विषाणू निर्मूलक ‘आयन डोम’ बाजारात आणणार आहे. या डोमला आयसीएमआरची मान्यता व आयएलएसी प्रयोगशाळेची अधिस्वीकृती आहे. हे उत्पादन अद्वितीय प्युरिफिकेशन तंत्रज्ञानाचा आविष्कार करते. घर, कार्यालय, रेस्टॉरंट, जीम, वर्गखोली आणि कॅबिन यांसारख्या मर्यादित ठिकाणी ते हवा शुद्ध करण्यासाठी वापरता येईल. देशात कोविड-१९ विषाणूने धुमाकूळ घातलेल्या या काळात हे उत्पादन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. फिक्कीने जारी केलेल्या माहितीनुसार, भारतातील वेलनेस उद्योग ४९० अब्ज रुपयांचा आहे. येणाऱ्या वर्षांत त्यात आणखी वाढ होईल. तसेच वेगवेगळी उत्पादनेही बनतील त्यामुळे या क्षेत्राला अतिशय उज्वल भविष्यकाळ असेल.बर्ग इलेक्ट्रॉनिक्स आगामी काळात आणखी अधिक विकसित तंत्रज्ञान असलेली व स्वदेशी वेलनेस उत्पादने बाजारात आणणार आहे. कार विषाणू निर्मूलक, वय-रोधक फेसमास्क, हायड्रोजन पाणी इत्यादींचा त्यात समावेश असेल. या कंपनीतर्फे नागरिकांना आरोग्यपुर्ण जीवनशैली जगता यावी यासाठी विविध प्रकारची उत्पादने बाजारात आणण्याचा मानस आहे. या कंपनीतर्फे आरोग्यपुर्ण वातावरणात रहाता यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
धूत ट्रान्समिशनने सुरू केले ‘हेल्थ अँड वेलनेस व्हेंचर’!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:55 AM