सोपान पांढरीपांडे
नागपूर : रिझर्व्ह बँकेची उपकंपनी असलेली डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) सर्व बँकांच्या संपूर्ण ठेवींना विमा संरक्षण देऊ शकते. परंतु सध्या बँकांमधील एका व्यक्तीच्या एकाच खात्यातील एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना डीआयसीजीसी विमा संरक्षण देत आहे.
डीआयसीजीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या २०१७-१८ च्या ताळेबंदानुसार डीआयसीजीसीजवळ ८१,४३० कोटींचा ठेव विमा निधी आहे व तो दरवर्षी १०,००० ते ११,५०० कोटींनी वाढतो आहे. त्यामानाने डीआयसीजीसीने चुकत्या केलेल्या विमा दाव्यांची रक्कम अर्धी म्हणजे ५,०८० कोटी एवढी कमी आहे.
डीआयसीजीसीला २०१७-१८ साली प्रीमियमचे उत्पन्न ११,१२८ कोटी मिळाले व गुंतवणुकीवरील व्याजातून ६ कोटी असे ११,१३४ कोटींचे निव्वळ उत्पन्न झाले. त्यावर्षी डीआयसीजीसीचा करपूर्व नफा १८,४५७ कोटी होता व करवजा जाता निव्वळ नफा ११,५०७ कोटी होता. यावर्षी कंपनीने विमा दाव्यापोटी ५,०८० कोटी बँक ठेवीदारांना दिले आहेत. देशातील दुसरी बाब म्हणजे डीआयसीजीसीने देशातील २,१०९ बँकांना विमा संरक्षण कवच उपलब्ध केले आहे. या बँकांमध्ये एकूण ११२.२० लाख कोटी ठेवी आहेत व एकूण खात्यांची संख्या १९४ कोटी आहे. त्यापैकी १७७ कोटी खात्यांमधील पूर्ण ठेवींना डीआयसीजीसीचे विमा संरक्षण मिळते आहे. याचा अर्थ केवळ १७ कोटी खात्यांमध्ये एक लाखापेक्षा अधिक रकमेच्या ठेवी आहेत व हीच खाती विमा संरक्षणाबाहेर आहेत. परंतु डीआयसीजीसीला दरवर्षी होणारा नफा लक्षात घेता, या १७ कोटी खात्यांमधील ठेवींना डीआयसीजीसी विमा संरक्षण सहज देऊ शकते.
दरम्यान जोखमीचे मूल्यांकन करून विमा प्रीमियम ठरवणारे अॅक्चुअरी संजय राठी यांनीही डीआयसीजीसी देशातील सर्व बँक ठेवींना विमा संरक्षण देऊ शकते, याला दुजोरा दिला. डीआयसीजीसीची ठेव विमा संरक्षण मर्यादा १९९३ साली डॉ. मनमोहन सिंग वित्तमंत्री असताना ३०,००० वरून एक लाख झाली होती. त्यानंतर गेल्या २६ वर्षांत अनेकदा मागणी होऊनही ही मर्यादा वाढली नाही, याकडेही राठी यांनी लक्ष वेधले. आता डीआयसीजीसी ही मर्यादा दोन लाख करण्याचा विचार करीत आहे, अशीही माहिती दिली.
डीआयसीजीसीची ठेव विमा संरक्षण मर्यादा १९९३ साली डॉ. मनमोहन सिंग वित्तमंत्री असताना ३०,००० वरून एक लाख झाली होती.
डीआयसीजीसीला संपर्क केला असता कुणीही अधिकारी ठेव विमा संरक्षणाबाबत बोलायला तयार झाला नाही. डीआयसीजीसीच्या वेबसाईटवरील ताळेबंदानुसार ८१,४३० कोटींचा ठेव विमा निधी आहे.