Join us

“हिंडेनबर्गला स्वत:च्याच देशात गडबड दिसली नाही का?”; SVB पतनावरुन नेटकऱ्यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 9:23 AM

अदानी समूहातील घोटाळे शोधणाऱ्या हिंडेनबर्गला आपल्याच देशातील बँकेतील गडबड लक्षात आली नाही, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित ‘सिलिकॉन व्हॅली बँके’चे (एसव्हीबी) पतन झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नेटकऱ्यांनी शॉर्ट-सेलर संस्था ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ला लक्ष्य केले आहे. भारतातील अदाणी समूहातील घोटाळे शोधणाऱ्या हिंडेनबर्गला आपल्याच देशातील बँकेतील गडबड लक्षात आली नाही, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदाणी समूहातील कंपन्यांचे समभाग ८० टक्के कोसळले असून गुंतवणूक संस्था जीक्यूजीने १५ हजार कोटींची गुंतवणूक केल्यानंतर समभागांत काही सुधारणा झाल्याचे दिसत आहे. अभिनेता विंदू दारासिंहने म्हटले की, ‘हिंडेनबर्गने एसव्हीबी बँकेचा अभ्यास का नाही केला?’ एका समाज माध्यम वापरकर्त्याने लिहिले की, ‘अदाणी समूहाने आपले सर्व कर्ज फेडले आहे. त्याचवेळी अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक धारातीर्थी पडली आहे. हिंडेनबर्गने या बँकेबाबत मात्र काहीच म्हटलेले नाही. यावरून त्यांच्या संशोधन दर्जा कळतो.’ अन्य एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे लोक हेतूत: भारतीय कंपन्या व अर्थव्यवस्था बरबाद करू पाहत आहेत. आपल्या शेजारी असलेल्या एसव्हीबी बँकेतील घोटाळा त्यांना दिसला नाही.’ तर एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘हिंडेनबर्ग जेव्हा भारतीय समूह अदाणीसोबत व्यस्त होता, तेव्हा त्यांच्या देशातील एसव्हीबी दिवाळखोर झाली. एसव्हीबी केवळ २ दिवसांत बरबाद झाली.’

व्याजदरवाढीमुळे निर्माण झाली समस्या

आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की, ‘हिंडेनबर्गने आपल्या देशातील कंपन्यांच्या वही खात्यांची तपासणी कधी केली नाही. हे पूर्ण प्रकरण फेडची नकारात्मक भूमिका दर्शविते. फेडने व्याजदर वाढवून बँकांत समस्या निर्माण केल्या आहेत. हे प्रकरण अन्य बँका आणि बाजारांतही पसरू शकते.’

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अमेरिका