Join us

SBI ने गृहकर्जाचे व्याजदर खरंच वाढवले? जाणून घ्या काय म्हणाली देशातील सर्वात मोठी बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 12:24 PM

SBI Home loan Interest rates confusion: स्टेट बँक ही अशी बँक आहे जी आरबीआयने रेपो दरात कपात केली की लगेचच व्याजदर कमी करते. इतर बँका याचा फायदा खूप कमीवेळा ग्राहकांना देतात. यामुळे एसबीआयने दर वाढविल्याने त्याची री अन्य बँका ओढण्याची शक्यता होती.

भारताची सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेने (State Bank of India) होम लोनवरील (Home Loan) वरील कमीतकमी व्याजदरात (Minimum Interest Rate) वाढ केली आहे. परंतू ही वाढ नसून मार्च महिन्यात व्यवसाय वृद्धीसाठी कमी केलेले व्याजदर पुन्हा मूळ स्थितीत आणल्याचा खुलासा एसबीआयने (SBI) केला आहे. SBI च्या वेबसाईटनुसार हा व्याजदर आता 6.70 टक्क्यांवरून 6.95 टक्के झाला आहे. (SBI home loan interest rates not hiked, after offer ends they reseted.)

हा नवा दर (New Interest rate) 1 एप्रिल 2021पासून लागू करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे स्टेट बँक ही अशी बँक आहे जी आरबीआयने रेपो दरात कपात केली की लगेचच व्याजदर कमी करते. इतर बँका याचा फायदा खूप कमीवेळा ग्राहकांना देतात. यामुळे एसबीआयने दर वाढविल्याने त्याची री अन्य बँका ओढण्याची शक्यता होती. यामुळे आता एसबीआयनेच यावर खुलासा करत व्याजदरवाढीच्या वृत्तावर पडदा टाकला आहे. 

स्टेट बँकेने गेल्या मार्चमध्ये स्पेशल ऑफर देत 6.70 टक्क्यांनी कर्ज उपलब्ध केले होते. हा व्याजदर सर्वात कमी होता. ही सूट 31 मार्चपर्यंत देण्यात आली होती. ही लिमिटेड पिरिएड ऑफर होती. या ऑफरची मुदत संपल्याने एसबीआयने कर्जाचे व्याजदर पुन्हा होते त्या ठिकाणी आणून ठेवले आहेत. 

एसबीआय काय म्हणते...एसबीआयच्या वेबसाईटनुसार होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क-लिंक्ड रेट (EBLR) पेक्षा 40 बेसिस पॉईंटनी अधिक उपलब्ध आहे. EBLR  हा आरबीआयच्या रेपो रेटवर जोडलेला आहे. तो सध्या 6.65 टक्के आहे. म्हणजेच सध्या होम लोन 7 टक्क्यांवर उपलब्ध आहे. जर लोन प्रपोजलमध्ये अर्जदार महिला असेल तर 5 बीपीएसची सूट दिली जाते. यामुळे हे लोन 6.95 टक्के व्याजदरावर होते. याशिवाय बँक लोनची प्रोसेसिंग फी देखील घेणार आहे. जी लोन रकमेच्या 0.40 टक्के आणि जीएसटी अशी असणार आहे. कमीतकमी 10000 रुपये आणि अधिकाधिक 30000 रुपये असणार आहे.

टॅग्स :एसबीआयघरस्टेट बँक आॅफ इंडिया