नवी दिल्ली : आयकर विवरण दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. ती वाढण्याची शक्यता यंदा कमीच आहे. आयकर विवरण दाखल करण्यासाठी नाेकरदार वर्गाला कंपनीकडून फाॅर्म-१६ देण्यात येताे. कर्मचाऱ्यांना कंपनीला कर बचतीबाबत गुंतवणूकीची माहिती द्यावी लागते. ती दिलेली नसेल तरीही सवलतीचा लाभ घेता येताे.
जानेवारीत मागतात कागदपत्रे
कंपन्या दरवर्षी जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना करबचती संदर्भात पुरावे मागतात. सध्या २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी आयकर विवरण दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विवरण दाखल करताना सवलतींचा दावा पीपीएफ, आयुर्विमा, टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड, मेडिक्लेम, घरभाडे आदींशी संबंधित कागदपत्रे दिलेली नसली तरीही विवरण दाखल करता येते. कंपनीने करकपात केली असेल तरीही पात्र करदात्यांना कर परतावा मिळू शकताे. करबचतीच्या याेजनांवर जुन्या रचनेतच लाभ मिळेल. नव्या रचनेत हे लाभ नाहीत.
काय करावे?
आयकर विवरण भरताना प्रत्येक टप्प्यावर संबंधित गुंतवणुकीची माहिती भरावी लागते. घरभाडे भत्त्याचीही माहिती दिल्यास नियमांनुसार सवलत मिळते.
आयकर विभागाच्या वेबसाइटवरून फाॅर्म २६ एएस डाउनलाेड करावा. ताे विवरण भरताना अपलाेड करावा. त्यातून एकूण करकपातीची जुळवणी केली जाते.
शेवटच्या टप्प्यात सर्व वजावटींची आकडेमाेड झाल्यानंतर तुमच्या नावाने अतिरिक्त करकपात झालेली असल्यास ती परत मिळते.
गुंतवणूक व वजावटीसंदर्भातील सर्व कागदपत्रे जवळ ठेवा.
मागणी झाल्यास ती द्यावी लागतात. खाेटी माहिती दिल्यास कारवाई केली जाऊ शकते.