आयटीआर दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. ३१ जुलैनंतर आयटीआर केल्यास दंड भरावा लागू शकतो या भीतीने करदाते घाईघाईत आयकर विवरणपत्रे दाखल करीत आहेत. पण यात चुका होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच त्यामुळेच करसल्लागार अखेरच्या क्षणी आयटीआर न भरण्याचा सल्ला देतात. अशा चुका झाल्या तरी चिंता नसावी कारण सुधारित आयटीआर भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी नेमक्या काय अटी घालून दिल्या आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे.
सुधारित आयटीआरसाठी नियम काय?
चूक झाल्यास आयकर कायदा कलम १३९(५) नुसार सुधारित आयटीआर दाखल करता येते. सुधारित आयटीआरवर भरलेल्या रिटर्नचा पोचपावतीचा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. सुधारित दाखल केल्यानंतरही ३० दिवसांच्या आत पडताळणी करणे गरजेचे आहे.
यासाठी वेळेची मर्यादा घालून दिलेली नाही. करदात्यांना कितीही वेळा सुधारित आयटीआर दाखल करता येते. तुमचा रिफंड जारी झाल्यानंतरही सुधारित रिटर्न दाखल करता येते. सुधारित रिटर्न भरण्यासाठी करदात्यांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या तीन महिने आधी सुधारित रिटर्न भरता येते. या काळातही न भरता आल्यास वर्ष पूर्ण होण्याआधी ते दाखल करण्याची मुभा असते. यानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सुधारित रिटर्न भरण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२४ ही असणार आहे.
जर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रांच्या स्वरुपात रिटर्न दाखल केले असेल तर सुधारित रिटर्न दाखल करण्याची परवानगी नसते. अशा स्थितीत केवळ वरिष्ठ नागरिकांना ही मुभा दिली जाते.
अंतिम मुदत हुकल्यास काय करावे?
सुधारित आयटीआरही वेळेत भरता आला नाही तर अपडेट युवर रिटर्न ही सुविधा घेता येते. दिलेली अंतिम तारीख चुकली असेल तरच ही संधी मिळते. चुकीची माहिती सुधारण्यासाठी याचा वापर करता येत नाही. यासाठी आयटीआर-यू हा फॉर्म निवडावा लागतो.
काय चुका होऊ शकतात?
स्वत:चे नाव चुकीचे लिहिणे. पॅन कार्ड-आधारची चुकीची माहिती. बँक खात्याच्या क्रमांक लिहिण्यात चूक. चुकीच्या फॉर्मची निवड. कर वजावटीचा चुकीचा दावा करणे.