नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या किमतींपासून आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बिझनेस टुडेने दिलेल्या एका वृत्तानुसार, सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारातील तेलांच्या किमतीवर होईल.
बिजनेस टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे, की पेट्रोलियम अँड नेच्युरल गॅस मंत्रालय (MoPNG) आणि अर्थमंत्रालय (Finance Ministry) उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात करण्याचा विचार करत आहे. महत्वाचे म्हणजे, तेल कंपन्यांनी मंगळवारी सलग सहाव्या दिवशी तेलाच्या किंमतीत कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाही.
एलपीजी सिलिंडर पुन्हा महागणार!
एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कसल्याही प्रकारची वाढ होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, कमर्शियल गॅस सिलिंडर महाग होऊ शकते. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 949.50 रुपये एवढी आहे.
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क किती -
सरकारला उत्पादन शुल्काच्या माध्यमातून पेट्रोलवर प्रति लीटर 27.90 रुपये तर डिझेलवर प्रति लीटर 21.80 रुपये मिळतात, असे अर्थमंत्रालयाने 2021 मध्ये लोकसभेत सांगितले होते. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपये कमी केले होते. आता सरकारने यात परत कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होऊ शकतात.