मुंबई- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच चालले होते. त्यातून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून पेट्रोलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात केली होती. परंतु राज्य सरकारनं डिझेलचे दर जैसे थेच ठेवले होते. अखेर आज राज्य सरकारनंही डिझेलच्या दरातही 1.5 रुपयांची कपात केली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेली कपात मिळून डिझेल 4 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तत्पूर्वी डिझेलच्या बाबतीत आपण देशात आठव्या क्रमांकावर असून आपले दर आधीच कमी आहेत, असं कारण देत राज्य सरकारनं डिझेलच्या दरात कपात करण्यात काल नकार दिला होता. परंतु आता डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी 2.5 रुपयांनी इंधनाचे दर कमी करण्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारांनाही आणखी 2.5 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने लगेचच 2.5 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट दिली आहे.