लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवरील तोटा कमी करण्यासाठी तेल कंपन्यांनी डिझेलच्या खरेदीवर प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली आहे. सूत्रानुसार, ही वाढ फक्त मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे, जसे की बस ऑपरेटर आणि मॉल्समध्ये वापरण्यासाठी खरेदी केलेल्या डिझेलवर करण्यात आली आहे. सध्या तरी किरकोळ दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल पंपावरील विक्री सलग पाचव्या महिन्यात वाढली आहे. बस ऑपरेटर आणि मॉल्ससारखे मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्ते स्वस्तात डिझेल खरेदी करण्यासाठी थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून टँकर बुक करण्याऐवजी पंपांकडून (इंधन विक्रेते) डिझेल खरेदी करत आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा आणखी वाढला आहे. या तोट्याचा सामना करण्यासाठी कंपन्या आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत आहेत.
इंधनाच्या दरात वाढ झाल्याचा सर्वात मोठा फटका नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल सारख्या खासगी वितरकांना बसला आहे. तोट्यामुळे पंप बंद करण्याची कंपन्यावर आली आहे. तोट्यामुळे रिलायन्सने आपल्या विक्रेत्यांना डिझेलच्या पुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यास सांगितले आहे.
मुंबईत ९४ रुपयांचे डिझेल १२२ रुपयांना
मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्यांसाठी मुंबईत डिझेलचा दर १२२.०५ रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याच वेळी मुंबईतील पेट्रोल पंपांवर डिझेल ९४.१४ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. अशा स्थितीत मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदीदारांना डिझेलसाठी प्रतिलिटर २८ रुपये अधिक मोजावे लागत आहेत.
पेट्रोल-डिझेल १५ रुपयांनी महाग होणार?
कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलर आहे. त्याचबरोबर तेल कंपन्यांनी ३ नोव्हेंबरपासून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तेव्हापासून कच्चे तेल प्रति बॅरल ३० डॉलरपेक्षा महाग झाले आहे. कच्चे तेल प्रति बॅरल १ डॉलरने महाग झाल्यास पेट्रोल-डिझेलच्या किमती ५५ ते ६० पैशांनी वाढतात. त्यामुळे अशा स्थितीत इंधनाच्या किमती १५ रुपयांपर्यंत वाढू शकतात. एका अहवालानुसार तेल कंपन्यांना तोट्यातून बाहेर पडण्यासाठी प्रतिलिटर १२ रुपयांनी वाढ करावी लागणार आहे.