नवी दिल्ली : इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सुरू असलेली वाढ सलग पंधराव्या दिवशीही सुरूच होती. रविवार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लिटरमागे अनुक्रमे ३५ आणि ६० पैशांची वाढ करण्यात आली. या वाढीमुळे डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
लॉकडाऊनच्या काळामध्ये सलग ८२ दिवस इंधनाच्या दराचा दररोज आढावा घेणे इंधन कंपन्यांनी थांबविले होते. त्यानंतर ७ जूनपासून पुन्हा ही पद्धत अवलंबली जात आहे. गेले सलग १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे. या पंधरा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये अनुक्रमे रुपये ७.९७ आणि ८.८८ अशी वाढ झाली आहे. या दरांशिवाय पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून व्हॅटची आकारणीही होत असते. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये ग्राहकाच्या खिशामधून यापेक्षा जास्त रक्कम जात असते.
>आॅक्टोबर, २०१८ मध्ये गाठले होते शिखर
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी आॅक्टोबर, २०१८ मध्ये शिखर गाठले होते. दिल्लीमध्ये १६ आॅक्टोबर, २०१८ रोजी डिझेलचा दर ७५.६९ रुपये प्रतिलिटर होता. हा आतापर्यंतचा उच्चांक होता. रविवारी झालेल्या दरवाढीनंतर डिझेलचा दर ७८.२७ रुपये प्रतिलिटर झाला असून, त्याने नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोलचा दर ४ आॅक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये ८४ रुपयांवर पोहोचला होता. तो आतापर्यंतचा उच्चांक आहे. रविवारी दिल्लीतील पेट्रोलचा दर ७९.२३ रुपये प्रतिलिटर असा झाला आहे.
दरवाढीनंतर डिझेलचा दर झाला विक्रमी
पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्य सरकारांकडून व्हॅटची आकारणीही होत असते. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये ग्राहकाच्या खिशामधून यापेक्षा जास्त रक्कम जात असते.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:26 AM2020-06-22T01:26:39+5:302020-06-22T01:27:18+5:30