Join us

डिझेल वाहन बंदीचा सुझुकीवर परिणाम नाही

By admin | Published: May 31, 2016 6:08 AM

मोठ्या डिझेल वाहनांच्या नोंदणीवर राजधानी दिल्लीत बंदी घालण्याच्या निर्णयाचा जपानची कंपनी सुझुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले

टोक्यो : मोठ्या डिझेल वाहनांच्या नोंदणीवर राजधानी दिल्लीत बंदी घालण्याच्या निर्णयाचा जपानची कंपनी सुझुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले. स्वयंचलित वाहनांच्या उत्पादनात सुझुकी मोटार्सचा मोठा वाटा आहे. भारतात जी बाजारपेठ सुझुकीने मिळविली आहे ती बघता बंदी निर्णयाचा परिणाम तिच्यावर होण्याची शक्यता नाही, असे जेटली म्हणाले.जेटली यांचे रविवारी जपानच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर येथे आगमन झाले. गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना ते या दौऱ्यात भेटतील व मंगळवारी जेटली सुझुकी मोटार्सचे अध्यक्ष ओसामु सुझुकी यांना भेटतील. भारतातील स्वयंचलित वाहन उत्पादन क्षेत्रासाठी हा संक्रमणाचा काळ असून, तो सुरू आहे. भारतातील जेवढी बाजारपेठ सुझुकीकडे आहे ती बघता तिच्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असे अरुण जेटली म्हणाले. दोन हजार सीसीच्या मोठ्या डिझेल वाहनांवरील बंदीनंतर भारताच्या धोरणाबाबतच्या अनिश्चिततेबद्दल सुझुकी यांच्याशी चर्चेवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. बंदीमुळे राजधानी दिल्ली आणि केरळमध्ये प्रदूषण कमी होईल, असेही ते म्हणाले.मोठ्या डिझेल कार्स आणि स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्सवर (दोन लीटर किंवा त्यापेक्षा जास्त इंजिनच्या) गेल्या डिसेंबरमध्ये पहिल्यांदा बंदी घालण्यात आली होती. आता ती बंदी केरळमध्येही घालण्यात आली आहे; मात्र केरळमध्ये उच्च न्यायालयाने बंदीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी गेल्या महिन्यात बंदीचे ‘पूर्णपणे मनमानी’ अशा शब्दांत वर्णन केले होते. मारुती सुझुकीकडे भारतातील पेट्रोल व्हेईकल्सची ६० टक्के, तर डिझेल व्हेईकल्सची २८ टक्के बाजारपेठ आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जगातील सर्वांत मोठी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने या बंदीचे ‘भारताची सगळ्यात वाईट जाहिरात असेल,’ अशी टीका केली होती.