Join us  

नॉमिनी आणि उत्तराधिकारी, पाहा काय आहे यात फरक; तुमच्यानंतर संपत्तीचा मालक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 11:33 AM

अनेकदा आपल्याला नॉमिनी आणि उत्तराधिकारी हे एकच असल्यासारखं वाटतं. पण या दोन्हीमध्ये मोठं अंतर आहे.

सध्या बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अनक्लेम्ड रक्कम पडून आहे. यासाठी आता रिझर्व्ह बँकेनंही पावलं उचलली आहेत. ग्राहकांनी त्यांच्या वारसांचं नॉमिनी करावं आणि त्यांना याची माहिती द्यावी असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी बँका आणि वित्तीय संस्थांना सांगितलं. यामुळे कोणताही दावा नसलेल्या डिपॉझिटच्या (अनक्लेम्ड डिपॉझिट) समस्येचा सामना करण्यास मदत मिळणार आहे. 

संपत्ती खरेदी करताना, मालमत्तेशी संबंधित काम, बँक खातं किंवा पॉलिसी खरेदी करताना, तुम्हाला एखाद्याला नॉमिनी बनवण्यास सांगितलं जाते. तुमच्या पश्चात त्या खात्यातून किंवा पॉलिसी इत्यादीमधून पैसे काढण्याचा अधिकार फक्त नॉमिनीलाच मिळतो. पण तुमचा नॉमिनी देखील उत्तराधिकारी असावा असं नाही. होय, बरेच लोक नॉमिनी आणि उत्तराधिकारी एकच मानतात. पण त्यात खूप फरक आहे.

कोण असतं नॉमिनी ?जेव्हा तुम्ही एखाद्याला मालमत्ता किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणत्याही योजनेत नॉमिनी बनवता तेव्हा तो त्याच्या संरक्षकाच्या रूपात असतो. तुमच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला त्या पॉलिसीच्या मालमत्तेवर किंवा पैशावर दावा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. पण केवळ नॉमिनी होऊन त्याला मालकी हक्क मिळत नाहीत. जर बँक खातेदार, विमाधारक किंवा मालमत्तेच्या मालकानं कोणतेही मृत्यूपत्र केलं नसेल, तर त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनी त्याच्या मालमत्तेवर किंवा पॉलिसीवर दावा करेल तेव्हा त्यात कोणताही वाद नसेल तरच ती रक्कम नॉमिनीला दिली जाऊ शकते. जर मृत व्यक्तीचे वारस असतील तर ते त्यांच्या हक्कासाठी त्या रकमेवर किंवा मालमत्तेवर दावा करू शकतात. या प्रकरणात, मालमत्तेची रक्कम किंवा भाग सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान प्रमाणात विभागला जाईल.उत्तराधिकारी म्हणजे नक्की कोण?वारस म्हणजे ज्याचं नाव मालमत्तेच्या वास्तविक मालकानं कायदेशीर मृत्यूपत्रात लिहिलेलं असतं किंवा उत्तराधिकाराच्या कायद्यानुसार त्याचा मालमत्तेवर अधिकार असतो. मालकाच्या पश्चात नॉमिनी निश्चितपणे त्याचे पैसे काढून घेतो, परंतु त्याला ही रक्कम ठेवण्याचा अधिकार नाही. ही रक्कम त्याला त्याच्या वारसांकडे सोपवावी लागते. जर नॉमिनी असलेली व्यक्ती त्या वारसांपैकी एक असेल तर त्याला मालमत्तेचा हिस्सा किंवा पैशांतील हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे. तुमच्या मृत्यूनंतर इच्छित नॉमिनी तुमच्या संपूर्ण मालमत्तेचा मालक असावा असे तुम्हाला वाटत असेल, तर मृत्यूपत्रात त्याचे नाव स्पष्टपणे नमूद करणं आवश्यक आहे.

क्लास १ आणि क्लास २ मध्ये फरक कायक्लास १ वारसांना प्रथम रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यात पैशांचं समान वाटप होणं आवश्यक आहे. परंतु क्लास १ वारसांपैकी कोणीही नसल्यास, क्लास २ वारसांमध्ये विभाजन केलं जातं. मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, आई क्लास १ मधील तर वडील, मुलगा आणि मुलगी, भाऊ, बहीण, भावाची मुलं आणि बहिणीची मुलं क्लास २ मध्ये येतात.

टॅग्स :व्यवसायपैसा