मुंबई : इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा कंपनी व्यवस्थापनावर तोफ डागली आहे. सॉफ्टवेअर उद्योग कठीण काळातून प्रवास करत असताना, वरिष्ठ व्यवस्थापन स्वत:ला चांगले वेतन वाढवून घेत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना सामान्य माणसाचा भांडवलशाहीवरील विश्वास कायम राहण्यासाठी त्याग करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. वरिष्ठ कर्मचारी घसघशीत वेतनवाढ घेत असताना, नव्याने या क्षेत्रात आलेल्या कर्मचा-यांना त्याच त्या वेतनावर काम करावे लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.आयआयटी मुंबई येथे एका कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती म्हणाले की, आयटी क्षेत्रासाठी हा कठीण काळ आहे. वरिष्ठ स्तरावरील लोक चांंगली वेतनवाढ घेत आहेत. मात्र, कनिष्ठ कर्मचाºयांना कोणतीही वाढ करत नसल्याबद्दल मूर्ती यांनी काळजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ज्या देशात एवढी गरिबी आहे, त्या देशात भांडवलशाही स्वीकारार्ह बनविण्याचा हा मार्ग नाही. जर आम्ही भांडवलशाहीवर विश्वास करत असू आणि पुढे जाण्यासाठी हाच चांगला मार्ग वाटत असेल, तर भांडवलशाहीत नेतृत्व करणाºयांना संयम राखावा लागेल. कारण हेच लोक कंपनीतील लाभांचा वाटा स्वत:मध्ये वाटून घेत आहेत. नारायण मूर्ती म्हणाले की, आयटी क्षेत्र अवघड वळणांवरून प्रवास करत आहे.अनेक वर्षांतून एकदा असे होऊ शकते. कारण या क्षेत्रातील गुंतवणूक जगातील विकसित भागातून झाली आहे आणि पुन्हा गुंतवणूक करण्यापूर्वी ते फायदे घेऊ इच्छितात. ‘नेसकॉम’च्या म्हणण्यानुसार देशांतर्गत आयटी क्षेत्रातून प्रत्यक्ष स्वरूपात ४० लाख रोजगार मिळतात, तर याचा महसूल १५० बिलियन डॉलर एवढा आहे.
आयटी क्षेत्रासाठी सध्या कठीण काळ; वरिष्ठ तुपाशी, कर्मचारी उपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 1:56 AM