Join us

मुकेश अंबानी यांना कच्चे तेल मिळण्यात अडचणी; घ्यावी लागतेय जास्तीची मेहनत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:06 PM

जगातील सर्वात मोठी रिफायनरी चालवणाऱ्या मुकेश अंबानी यांना कच्चे तेल मिळण्यात अडचणी येत आहेत.

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिफायनरी चालवते. परंतु पश्चिम आशिया आणि रशियातील सध्याच्या परिस्थितीमुळे ही रिफायनरी चालवण्यासाठी कच्चे तेल मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे रिलायन्सला आता जास्तीचे काम करावे लागणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज ही जगातील सर्वात मोठी कच्च्या तेल खरेदीदारांपैकी एक आहे. पण सध्या त्यांना कच्च्या तेलाचे काही बॅरल खरेदी करण्यासाठीदेखील खूप संघर्ष करावा लागत आहे. याचे कारण म्हणजे, तेल उत्पादक देशांची संघटना OPEC+ आपल्या पद्धतीने कच्च्या तेलाचा पुरवठा करू इच्छिते. याशिवाय रशियासारख्या मोठ्या देशावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत.

अशा परिस्थितीत रिफायनरीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज कच्च्या तेलासाठी कॅनडापर्यंत पोहोचत आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने अलीकडेच कॅनडाकडून ऍक्सेस वेस्टर्न ब्लेंड क्रूडचे 20 लाख बॅरल खरेदी करण्याचा करार केला आहे. याची पहिली खेपही रिलायन्सपर्यंत पोहचली. यासाठी एका मोठ्या जहाजाने प्रशांत महासागराद्वारे सुमारे 19,000 किलोमीटरचा प्रवास करुन कच्चे तेल भारतात आणले. यावरुन दिसून येते की, रिलायन्सला कच्च्या तेलासाठी आता जास्तीची मेहनत घ्यावी लागत आहे. 

जामनगर रिफायनरी क्षमतादरम्यान, रिलायन्सची जामनगर रिफायनरी ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी असण्याचे कारण केवळ त्याचा मोठा परिसर नाही, तर येथे दररोज 12,40,000 बॅरल कच्चे तेल शुद्ध केले जाते. रिलायन्स ब्रिटीश पेट्रोलियम कंपनी बीपीच्या सहकार्याने देशभरात पेट्रोल पंप चालवते, परंतु तिच्या रिफायनरीमध्ये बनवलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे प्रमुख ग्राहक युरोपियन देश आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सखनिज तेल