Join us  

डिजिटल बँकिंग १० लाख कोटींवर

By admin | Published: June 20, 2016 4:26 AM

इंटरनेट आणि अन्य तंत्रज्ञानानंतर गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर आता ग्राहकही या नव्या तंत्राला चांगलेच सरावले असून

मुंबई : इंटरनेट आणि अन्य तंत्रज्ञानानंतर गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर आता ग्राहकही या नव्या तंत्राला चांगलेच सरावले असून, डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १० लाख कोटी रुपयांचे वित्तीय व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे. बँकिंग उद्योगाशी संबंधित एका आंतरराष्ट्रीय कंपनीने ‘डिजिटल बँकिंग, ट्रान्सफर्मेशन आॅफ बँकिंग’ नावाने भारतातील डिजिलट बँकिंगचे चित्र स्पष्ट करणारा अहवाल तयार केला आहे. त्याद्वारे ही रंजक माहिती पुढे आली आहे.उपलब्ध माहितीनुसार, डिजिलट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांनी, पैसे काढणे, भरणे, पैसे ट्रान्स्फर करणे, बिल भरणा करणे, गिफ्ट चेक देणे, ई-कॉमर्स सेवांसाठी बँकेच्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून पैसे भरणे आदी सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या सर्व सेवांची ग्राहकाला माहिती झाली असून, ते या व्यवहारांसाठी सरावल्याचे दिसून आले आहे. हे व्यवहार करणे अतिशय सोयीचे असल्यामुळे ग्राहकांमध्ये या सेवा लोकप्रिय होत आहेत. डिजिटल बँकिंगचे तंत्रज्ञान इंटरनेटवर आधारित असले तरी इंटरनेट बँकिंग म्हणून सध्या जो प्रकार आहे, त्याच्या पुढची पायरी म्हणून डिजिलट बँकिंगकडे पाहायला हवे, असे मत डिजिटल बँकिंग विषयाचे अभ्यासक उपेंद्र राजगुरू यांनी व्यक्त केले. रोखीने होणाऱ्या व्यवहारांचा खर्च कमी कमी करण्यासाठी आणि एकूणच बँकिंग सेवांवरील ताण कमी करण्यासाठी बँकांनी आता इंटरनेट आणि डिजिटल बँकिंग सेवांचा प्रसार झपाट्याने करण्यास सुुरुवात केली आहे. या सेवा लोकप्रिय करण्यासाठी आणि या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसाठी ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक बँकांनी विविध व्यवहारांवर पाच ते २० टक्के अशी सूट देखील दिली आहे. यालाच ई-कॉमर्स कंपन्यांचीही जोड मिळताना दिसत आहे. बँकिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून ई-कॉमर्सचे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना तर ३० टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनांचा फायदाही अधिकाधिक ग्राहक डिजिटल बँकिंगकडे वळण्याच्या रूपाने होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)देशात इंटरनेटचा वाढता वापर, त्यात आलेली सुरक्षितता आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून वाढलेला इंटरनेटचा वापर या पार्श्वभूमीवर बँकांनी डिजिलट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. यात प्रामुख्याने बँकांनी स्वत:ची अ‍ॅप्स तयार करीत त्या माध्यमातून जे नित्याचे बँकिंग व्यवहार आहेत ते पूर्णपणे अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे २४ तासांत कधीही ग्राहकाला हवे तेव्हा हवे ते व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे केवळ ग्राहकांनाच सुविधा मिळाली नाही, तर यामुळे व्यवहारात वाढ झाल्यामुळे बँकांनाही फायदा होताना दिसत आहे.केवळ अ‍ॅप्सच्या माध्यमातूनच नव्हे, तर ग्राहक ज्या ज्या सेवा-सुविधांसाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरतात, त्या सर्वच प्लॅटफॉर्मवर आता बँकांनी प्रवेश केला आहे.उदाहरणाने सांगायचे तर फेसबुक आणि टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियावरूनही बँकांनी आता ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये देशातील खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियावरून ग्राहकांना पैसे ट्रान्स्फर करणे, बिल भरणा करण्यासारख्या सुविधा उपलब्ध असून, ग्राहकांचा या सेवांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.